धाराशिव, दि.३ (अमजद सय्यद) :जिल्ह्यातील विकासकामे ठप्प होण्यामागील डीपीडीसी निधी वाटपातील तिढा अखेर परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मदतीने सुटला आहे.! अकांक्षित जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी त्यांनी मध्यम मार्ग काढत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना कमी जास्त प्रमाणात निधी मिळेल याची हमी दिली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
या २६८ कोटी रुपयांच्या निधीच्या वाटपात जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराला तब्बल १४० कोटी रुपये मिळणार असल्याची चर्चा असून उर्वरित सर्व लोकप्रतिनिधींना मिळून १२८ कोटी रुपये वाटप होणार आहे.! या वाटपामुळे जिल्ह्यातील विकासकामांमध्ये काहीअंशी फेरबदल होण्याची शक्यता अधिक आहे. विशेष म्हणजे, याआधी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या बहुतांश कामांचे पुनर्विचार करून फेरबदल करण्याचे संकेत मिळाले आहेत.
जिल्ह्यातील एका नेत्याच्या अलीकडील प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या कामांवरील स्थगिती उठवण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर राजकीय पातळीवर चर्चेला जोर आला होता. जिल्ह्यातील जनतेच्या विकासकामांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळावा म्हणून पालकमंत्री सरनाईक यांनी स्वतः पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन हा तिढा सोडविला असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा मुद्दा म्हणजे १४० कोटी निधी मिळवणारा तो सत्ताधारी आमदार कोण? या प्रश्नाचे उत्तर अद्याप गुप्त ठेवण्यात आले आहे. याचबरोबर फेरबदल होणाऱ्या कामांच्या याद्याही प्रशासकीय स्तरावर मागविले असल्याचे कळते.
प्रशासकीय प्रक्रियेचा वेग अधिक वाढविण्यात येत असून सप्टेंबरअखेरपर्यंत सर्व कामांना मान्यता मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी जवळपास पाच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपीडीसीच्या कामांना स्थगिती दिली होती. त्यानंतर निधी वितरणाचा तिढा कायम राहिल्याने जिल्ह्यातील विकासकामांना मोठा ब्रेक बसला होता.
आता मात्र पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतल्याने जिल्ह्याच्या विकासकामांना गती मिळणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कामांच्या वाटपाचे सूत्र एका पत्राद्वारे निश्चित करण्यात आले असून हे पत्र थेट मुंबईत तयार झाल्याची माहिती पुढे आली आहे.
डीपीडीसीच्या निधीमुळे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या कामांचा प्रश्न सोडवला जाणार आहे. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रातील कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. स्थगितीमुळे थांबलेला विकास आता पुन्हा मार्गावर येण्याची चिन्हे आहेत.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












