धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १९ ऑगस्टपासून सुरू असलेले बेमुदत संप आंदोलन आज १८ व्या दिवशी पोहोचले आहे. शासनाने अद्याप कोणताही तोडगा न काढल्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना निवेदन सादर केले. सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
आरोग्य विभागात दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के समायोजन व्हावे, तसेच प्रत्येक वर्षी तीस टक्क्यांप्रमाणे सार्वजनिक आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागामध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली. शासन निर्णय दि.१४ मार्च २०२४ नुसार पात्र कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व हक्क द्यावेत, समान काम समान वेतन लागू करावे आणि वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार पगारवाढ द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. रिक्त पदांवर समायोजन न झाल्यास अधिसंख्य पदे निर्माण करून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात यावा, तसेच राष्ट्रीय आयुष मिशन, एचबीटी आपला दवाखाना, १५ वा वित्त आयोग नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रातील कर्मचाऱ्यांना आरोग्य अभियानातील रिक्त जागांवर समाविष्ट करण्यात यावे, असा ठराविक आग्रहही या निवेदनात व्यक्त करण्यात आला.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची सहा वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना नियमित करण्याचा निर्णय सर्वांवर लागू करावा, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समकक्ष पदे उपलब्ध नसल्यास नवीन पदे निर्माण करून समावेश करावा. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उपकेंद्रासाठी प्रस्तावित आकृतीबंधात कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांऐवजी नियमित पदे निर्माण करावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या वेळी किरण बारकुल, किशोर गवळी, किरण तानवडे, मुकुंद उंबरे, विनोद मोरे, शरद हिंगमीरे, संतोष कोरपे, नितीन सुरवसे, प्रशांत वाघमारे, दत्ता पुरी, वैशाली बिडवे, चांगुणा झोंबाडे, शीतल गायकवाड, मीनाक्षी सुरवसे यांच्यासह महिला व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













