मुस्लिमांनी मुलींच्या शिक्षणावर भर द्यावा : आमदार कैलास पाटील
18 मुलींनी सिरत उन स्पर्धेत मिळवले 100 पैकी 100 गुण
कळंब : ईद ए मिलादनिमित्त आझाद ग्रुप आणि आगाज फाउंडेशनच्या वतीने आयोजित स्पर्धेचं बक्षीस वितरण आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, कृ.उ. बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे, मुख्तारबेग मिर्झा, पोलीस निरीक्षक अजित चिंतले, उपनिरीक्षक पठाण, राजेंद्र मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मौलाना याहया कासमी, मुफ्ती फारुख, हाफिज आरेफ, हाफिज खालेद, मौलाना सादिक, मौलाना शोएब आणि मौलाना युन्नूस यांनी कुराण पठण केले. यावर्षी झालेल्या सिरत उन नबी प्रश्नोत्तर स्पर्धेत तब्बल 429 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी ‘ए’ गटातील तब्बल 24 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवत विशेष यश संपादन केले. यामध्ये 18 मुलींचा समावेश असून मुलींचा लक्षणीय सहभाग कौतुकास्पद ठरला. या सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी आमदार कैलास पाटील म्हणाले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात मुस्लिम समाजाने मुलींच्या शिक्षणावर भर द्यावा. घरातील मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब प्रगतीकडे वाटचाल करते. पैगंबर मोहम्मद यांच्या विचारांचे आचरण करून अशा उपक्रमांचे दरवर्षी आयोजन झाले पाहिजे.” तर माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी कळंब शहरातील सामाजिक एकात्मतेसाठी कार्य करणारे स्व. सलिमभाई मिर्झा यांचे योगदान अधोरेखित केले. पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावर्षीपासून आगाज फाउंडेशनतर्फे दिला जाणारा “सलिमभाई मिर्झा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार” ॲडव्होकेट अल्ताफहुसेन काझी यांना मुख्तारबेग मिर्झा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डिकसळचे उपसरपंच सचिन काळे, माजी सरपंच अमजद मुल्ला, मिनहाज शेख, इस्माईल हन्नूरे, रुकसाना बागवान, परवेज काझी, कुणाल मस्के, विश्वजित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आझाद ग्रुपचे मोहसीन मिर्झा, उमरान मिर्झा, समीर मिर्झा, उमान मिर्झा व अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन मुस्तान मिर्झा यांनी केले.
यांनी मिळवले 100 पैकी 100 गुण
शगुफ्ता मणियार, अरमान सौदागर, फायजा शेख, आमान शेख, हुमेरा मोमीन, अनस मणियार, उम्मे अयमन मणियार, उम्मे कुलसुम कुरेशी, मिसबा शेख, उमर सय्यद, उम्मे हानी मणियार, रोशनी मणियार, अलविरा जावेद, अरीज शेख, मुस्तकीम बागवान, अरमिश सय्यद, जैनब शेख, माहीन पठाण, मुब्बसिरा मणियार, शफिया मणियार, आहाना शेख, फातिमा सय्यद, मदिहा मणियार, सबाहत मणियार. बी ग्रुपमध्ये प्रथम तनजीला सय्यद, द्वितीय सोबिया मिर्झा तृतीय क्रमांक सुफीया पठाण यांनी पटकावले.














