हायवेवरून ट्रकवर चढून चोरी करणारी टोळी भाविकांना लुटण्यासाठी दरोड्याच्या तयारीतच जेरबंद – लेडी सिंघम शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
येरमाळा दि१० (प्रतिनिधी): धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा परिसरात हायवेवरून जाणाऱ्या ट्रकवर चढून माल चोरी करणाऱ्या टोळीचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. या घटनेचा माग काढत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेला सूत्रांकडून माहिती मिळाली की, याच टोळीतील काही आरोपी येडेश्वरी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची गाडी अडवून त्यांना लुटण्याच्या तयारीत आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मलकापूर गावाजवळ येडेश्वरी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रवाना झाले. दि. ८ सप्टेंबर रोजी सायं. ५.५० वाजता स्कॉर्पिओ गाडीत संशयास्पद हालचाल दिसून आल्याने पोलिसांनी गाडी घेरली. त्यावेळी दोन आरोपी पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून पकडण्यात आले तर इतरांना गाडीतच जेरबंद करण्यात आले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी हे अमोल नाना काळे (२८), किरण बापू पवार (२५), दत्ता दादा काळे (२१), गणेश नाना काळे (३२), सुभाष तानाजी काळे (२४) आणि शिवा रमा पवार (२२) सर्व राहणार तेरखेडा असे आहेत. त्यांच्या ताब्यातून दरोड्यासाठी लागणारे साहित्य, मोबाईल व महिंद्रा स्कॉर्पिओ असा मिळून ११ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरील आरोपी बाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या टोळीतील तिघे आरोपी पुणे शहरातील आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या ५० लाख रुपयांच्या दरोड्याच्या गुन्ह्यातही फरार आहेत.
सदर कारवाई जिल्ह्यात लेडी सिंघम म्हणून प्रसिद्ध पोलीस अधीक्षक श्रीमती शपकथ आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पो/ह विनोद जानराव, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, चा.पो. ह. महबूब अरब, तसेच विनायक दहीहंडी व प्रकाश बोइनवाड यांच्या पथकाने केली.
या धडक कारवाईमुळे केवळ हायवे चोरीप्रकरणी आरोपींना जेरबंद करण्यात आले नाही, तर भाविकांना लुटण्याचा कट उघडकीस येऊन त्यांचा जीव व माल सुरक्षित ठेवण्यात पोलिसांना यश आले. अवघ्या काही तासांत व्हायरल व्हिडिओतील आरोपींना अटक झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून जिल्हाभरातून या कारवाईचे कौतुक होत आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद” संपादक अमजद सय्यद 8390088786












