तुळजापूर (प्रतिनिधी):पत्रकार असल्याचे सांगत दरमहा पाच हजार रुपये हप्ता मागणाऱ्या एका व्यक्तीविरोधात तुळजापूर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी अशा बनावट पत्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष राजेंद्र दुधभाते, रा. वडगाव लाख, ता. तुळजापूर, जि. धाराशिव, याने दिनांक 08 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता वडगाव लाख शिवारातील गट क्रमांक 41 मधील शंभू हॉटेल येथे फिर्यादी खंडु उमराव लोहार (वय 43, रा. वडगाव लाख) यांना भेटून दरमहा पाच हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली.
फिर्यादीने ही मागणी नाकारल्यावर आरोपीने संतापून शिवीगाळ केली तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हातपाय तोडण्याची धमकी दिली. या प्रकरणाची फिर्याद दिनांक 09 सप्टेंबर 2025 रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरोधात भा.दं.वि. कलम 308(2), 115(2), 352, 351(3) सह भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ही घटना उघड झाल्यानंतर स्थानिक पातळीवर संताप व्यक्त होत आहे. खऱ्या अर्थाने जनतेसाठी लढणाऱ्या पत्रकारांवर अशा बनावट व खंडणीखोर प्रवृत्तीच्या लोकांमुळे बदनामी होत असल्याचे नागरिक सांगत समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर व सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.












