शालेय पोषण आहारातील तांदळाचा काळाबाजार :धाराशिव येथील वाहनावर औसा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धडक कारवाई
लातूर दि.१३(प्रतिनिधी):गरीब विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी शासनाकडून पुरवण्यात आलेला तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचा धक्कादायक प्रकार सिंघम म्हणून ओळखले जाणारे औसा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांच्या पथकाने उघड केला आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काचा घास लुटणाऱ्या या काळाबाजारू माफियांवर कठोर कारवाई करून शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी पालकांतून / जनतेतून होत आहे.
पोषण आहाराचा तांदूळ हा गरीब विद्यार्थ्यांचा जीवनदायी अन्न आहे. तो काळ्या बाजारात गेला तर विद्यार्थ्यांचे हक्क हिरावले जातात. हा गुन्हा केवळ विद्यार्थ्यांविरुद्ध नसून संपूर्ण समाजाविरुद्धचा गंभीर डाका आहे.
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यात दीड, दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारच्या (हेच वाहने) काळाबाजाराचा पर्दाफाश तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांनी केला होता. त्या वेळी बीड जिल्ह्यातील एका ठेकेदाराच्या मूक आदेशावरून धाराशिव येथील वाहनांची अदलाबदल करून “घोटाळेबाज” आठ दहा वाहने लातूर जिल्ह्यातील शालेय पोषण आहाराच्या वितरणासाठी नेण्यात आली होती. मात्र, त्याच वाहनांनी पुन्हा काळाबाजार सुरू केल्याचे औसा येथील प्रकरणावरून पुन्हा एकदा उघड झाले आहे. धाराशिव येथील गोडाऊन कीपर, दलाल वाहन चालक यांच्यावर कारवाई होऊन गोडाऊन कीपर सह दलाल याची झेलवारी देखील झाली होती,हीच मंडळी आता नव्या स्वरूपात सक्रीय झाल्याचे समोर आले आहे.
औसा पोलिसांनी अलीकडेच लातूर शहरातील एका पोषण आहाराचा तांदूळ टेम्पो क्रमांक MH 14 BJ 0786 हा काळया बाजारात (लातूर शहरातील मिल) पोहोचवला जात असतानाच औसा तालुक्यात रंगेहात पकडले. यामध्ये केवळ चालकावर कारवाई करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा संपूर्ण लातूर जिल्ह्यात पसरली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या घोटाळ्यात गोडाऊन कीपर, मिल चालक, काही शाळांचे मुख्याध्यापक तसेच जिल्हा परिषदेतील काही अधिकारी / कर्मचारी यांची मिलीभगत असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे .
विशेष म्हणजे, जिल्ह्यात सिंघम म्हणून ओळखले जाणारे उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी यांनी शालेय पोषण आहाराशी संबंध असलेल्या जिल्हा परिषदेतील विभाग, गोडाऊन कीपर, सर्व वाहन धारकांचे रेकॉर्ड/ गाडीचे कागदपत्र, त्यांचा धाराशिव येथील रेकॉर्ड व जिल्ह्यातील सर्व शाळांची नोंदी व दप्तर व सध्या स्थितीत उपलब्ध असलेल्या धान्याचा साठा तपासल्यास या काळाबाजारामागील राज्यातील सर्वात मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या घोटाळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या हक्काची सर्रास लूट होत असल्याने दोषींवर कठोर कारवाई करूनच उदाहरण घालावे, अन्यथा शासनाचा “ना खाऊंगा, ना खाने दूंगा” हा संकल्प केवळ कागदावरच राहील, अशी जनतेची प्रतिक्रिया आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची”
ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












