आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा २४ फेब्रुवारी रोजी धाराशिव येथे आक्रोश मोर्चा !
धाराशिव दि. १७( प्रतिनिधी )विविध क्षेत्रांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या समस्या भेडसावत आहे.
अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या भागांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या भागातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेचे शुल्क माफ करण्यात यावे. या स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत, तरी देखील भरमसाठ परीक्षा शुल्क घेऊन केवळ तिजोरी भरण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचे शुल्क तात्काळ कमी करण्यात यावे.
मुलींचे मोफत शिक्षण हा निर्णय सर्वस्तरांवर अद्यापही लागू झाला नसून यामध्ये अनेक अटी टाकण्यात आल्या आहेत. शासनाने काढलेल्या परिपत्रकात व महाविद्यालयात घेतल्या जाणाऱ्या शुल्कात मोठी तफावत आहे. महाविद्यालयांकडून फक्त ट्युशन फी माफ केली जात आहे. त्यामुळे हे मोफत शिक्षण असू शकत नाही. ही घोषणा विद्यार्थिनींना संभ्रमित करणारी आहे. या योजनेची अंमलबजावणी सर्व विद्यार्थिनींसाठी शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार करण्यात यावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेच्या प्रवेश, परीक्षा आणि निकाल या विषयांना घेऊन सातत्याने अनेक समस्या समोर येत आहेत. या समस्यांवर उपाययोजना करण्याची विद्यापीठाची कुठली ही सकारात्मक भूमिका दिसून येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे मानसिक आणि आर्थिक छळ थांबण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात. तसेच संलग्नित महाविद्यालयांना अन्य विद्यापीठात वर्ग होण्याची मुभा देण्यात यावी.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक व संलग्नित महाविद्यालय मधील शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी विद्यापीठातील रिक्त असलेली प्राध्यापक पदे तातडीने भरली जावी. तसेच आरोग्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टीने परीक्षा शुल्कात कपात व पायाभूत सुविधांच्या सुधारणा करणे अत्यंत अत्यावश्यक आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रलंबित भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी.आजच्या तंत्रज्ञानाधारित शिक्षणात अनेक महाविद्यालयांत डिजिटल साधनांचा व शिक्षकांचा तीव्र अभाव आहे. संगणक, इंटरनेट, ई-लर्निंग सुविधा व शिक्षक संख्या तातडीने वाढवावी.
विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात याव्या व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे.
अनेक शासकीय वसतिगृहांच्या इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना खाणावळीची व्यवस्था देखील उपलब्ध नाही व उपलब्ध असल्यास अत्यंत निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जाते. यामुळे शासकीय वसतिगृहांचे नूतनीकरण तसेच खानावळीची योग्य व्यवस्था विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी.
रुग्णसेवा, रात्रपाळ्या आणि ताणतणावाच्या कामामुळे Interns व Resident Doctors यांना मिळणारा स्टायपेंड अत्यल्प आहे. त्यामुळे त्यांचे स्टायपेंड वाढवण्यात यावे, जेणेकरून ते अधिक सक्षमपणे सेवा प्रदान करू शकतील.
आयटीआय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारा भत्ता हा वेळेवर विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हा भत्ता वेळेत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा.
आयटीआय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी असणारी उपकरणे व साहित्य जीर्ण अवस्थेत आहे. आयटीआय महाविद्यालयातील विविध इमारती कोसळून पडण्याच्या अवस्थेत आलेल्या आहेत. त्यामुळे नवीन इमारतींचे बांधकाम तसेच प्रात्यक्षिकासाठी लागणारे अद्यावत उपकरणे उपलब्ध करून देण्यात यावी. नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी केंद्रीय पद्धती प्रमाणे ८०:२० असा पॅटर्न लागू करण्यात आलेला आहे. हे अन्यायकारक असून सर्वांना नोकरीमध्ये समान संधी देण्यात यावी.अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या भागांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांचा खात्यावर जमा करण्यात यावेत.
अशा विविध समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने दुसऱ्यांदा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही प्रशासनाकडून केली जात नसल्यामुळे वरील सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यासाठी येत्या २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा निघणार आहे. तरी या आक्रोश मोर्चात सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहायचे आहे. असे आव्हान देखील आक्रोश मोर्चा प्रमुख भार्गव मंजुळे यांनी यावेळी केले.












