धाराशिव,दि.१८ ऑगस्ट (प्रतिनिधी) शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये,यासाठी सर्व यंत्रणांनी जबाबदारीने कार्य करावे,असे स्पष्ट निर्देश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिले.ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नागेश मापारी,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी देवदत्त गिरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर, प्रभारी जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी किशोर गोरे व सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी निकिता साकळे आदी उपस्थित होते.
ढवळे यांनी सांगितले की, शासनाच्या कल्याणकारी योजनांचा उद्देश गरीब व गरजूंना मदत पोहोचवणे हा आहे.”एखाद्या व्यक्तीकडे रेशन कार्ड असो वा नसो,त्याला धान्य आणि इतर सुविधा मिळाल्या पाहिजेत. गरजूंना रेशन कार्ड प्राधान्याने देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.त्यांनी यंत्रणांना उद्देशून सांगितले की,शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत योजना पोहोचवणे हेच प्रशासनाचे खरे समाधानकारक कार्य ठरेल.
बैठकीत विविध मुद्द्यांवर त्यांनी ठोस सूचना दिल्या.मयत स्थलांतरित नागरिकांची माहिती संकलित करून ती शासनाकडे सादर करावी, जेणेकरून त्यांच्या कुटुंबियांना योग्य ती मदत मिळू शकेल.पोषण आहाराच्या बाबतीत ढवळे यांनी विशेष भर दिला.सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी पालक भेटी घ्याव्यात,मुलांच्या पोषण स्थितीची पाहणी करावी,तसेच जेथे अडचणी आहेत त्याबाबत त्वरित उपाययोजना करावी,असे निर्देश त्यांनी दिले.
याशिवाय,जिल्हा तक्रार निवारण अधिकारी यांच्या कार्यालयाची माहिती प्रत्येक आवश्यक ठिकाणी स्पष्टपणे लावण्यात यावी,जेणेकरून कोणत्याही लाभार्थ्याला तक्रार मांडण्यासाठी अडचण येऊ नये. “लाभार्थ्याला त्याच्या हक्काचा लाभ मिळाला नाही,तर त्याची थेट नोंद तक्रार निवारण यंत्रणेकडे व्हायला हवी.अशा पारदर्शक यंत्रणेमुळे लोकांचा विश्वास वाढतो,”असे त्यांनी सांगितले.
ढवळे यांनी आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. सोनोग्राफीदरम्यान कमी वजन असणाऱ्या अर्भकांची माहिती संकलित करून त्यांच्या कुटुंबियांना विशेष आहार,औषधोपचार व सल्ला देण्यात यावा,असे त्यांनी स्पष्ट केले. या कामासाठी आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभागाने समन्वय साधावा,असेही त्यांनी सूचित केले.
ढवळे यांनी सांगितले की,”धान्य खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हे सर्वात समाधान देणारे कार्य आहे.यामध्ये कुठेही धान्य गळती होऊ नये.गरीब व गरजूंना मिळणारा एकेक दाणा हा त्यांच्या जगण्याचा आधार आहे.यासाठी अन्नधान्य वितरण प्रणाली मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला.
ढवळे पुढे म्हणाले की,अन्न आयोग स्वतः जिल्ह्यातील विविध भागांना भेट देणार आहे.पालकांशी थेट संवाद साधून पोषण आहार,शाळांमधील आहार व्यवस्था,तसेच धान्य वितरणाची प्रत्यक्ष स्थिती तपासली जाणार आहे.त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी जबाबदारीने काम केले पाहिजे,अन्यथा प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जातील,असा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीत जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी,गटशिक्षणाधिकारी,महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.सर्व यंत्रणांनी दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन यावेळी दिले. जिल्ह्यातील पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी,सर्व सीडीपीओ,सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.












