धाराशिव जिल्ह्यातील १५१ उमेदवारांना अनुकंपा व MPSC मार्फत नियुक्ती आदेश
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वितरण
मुंबई/धाराशिव दि. ४ (प्रतिनिधी) :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत तसेच दि. १७ जुलै २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील विविध शासकीय कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गट–क व गट–ड या पदांवर अनुकंपा नियुक्ती करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. त्याअंतर्गत धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलिस अधीक्षक कार्यालय व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) असे एकूण १५१ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली असून, या उमेदवारांना आज शनिवार दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले.
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला, तर पालकांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू दिसून आले. “या क्षणी उमेदवारांच्या कुटुंबियांच्या मनात जो अभिमान उमटला आहे, त्याहून मोठा गौरव माझ्यासाठी दुसरा नाही,” असे भावनिक उद्गार पालकमंत्री सरनाईक यांनी यावेळी काढले.
धाराशिव जिल्ह्यातील नियुक्तीचे तपशील असे की, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गट–क पदासाठी १९ तर गट–ड पदासाठी ४० अनुकंपा धारकांची शिफारस विविध विभागांना करण्यात आली. जिल्हा परिषदेमार्फत गट–क साठी ९ व गट–ड साठी ३८ उमेदवारांची निवड झाली. पोलिस विभागाकडून गट–क पदासाठी २ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लिपिक–टंकलेखक (गट–क) पदावर ४३ उमेदवारांची नियुक्ती झाली.
यातील अनेक उमेदवारांनी आपले पालक गमावले असून शासनाच्या पाठबळामुळे त्यांनी दुःखातून सावरत नवी उभारी घेतली आहे. “राज्य शासन जनतेच्या सुख–दुःखात सहभागी होत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर आहे,” असेही पालकमंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
या नियुक्त्यांमुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, तरुण पिढीसमोर शासकीय सेवेत उज्ज्वल भवितव्याची नवी दारे खुली झाली असल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786













