धाराशिवमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारणीला मंजुरी
अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी ऐतिहासिक योगदान…मातंग समाजाने केला आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा सत्कार
धाराशिव दि.१३.(प्रतिनिधी): साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस मानवंदना देण्यासाठी धाराशिव शहरात पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक उभारण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला अखेर मूर्त स्वरूप मिळाले आहे. या संदर्भात मातंग समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शिंगोली सर्किट हाऊस येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील शासकीय दूध संघाच्या जागेवर भव्य स्मारक उभारण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे 02 कोटी 8 लाख रुपये किमतीची एक एकर शासकीय दूध डेअरीची जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यासंबंधीचा शासकीय आदेशही निर्गमित झाला आहे. त्यामुळे गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेला मातंग समाजाच्या अस्मितेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
या बैठकीत नगरसेवक विलास (बापू) लोंढे यांनी समाजातील चळवळीत सहभागी असलेल्या सर्व प्रमुख ज्येष्ठ समाज बांधवांशी चर्चा करून स्मारक उभारणी करताना कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा याबाबत सविस्तर मांडणी केली. स्मारकाच्या संकल्पनेत अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, जीवनकार्य, सामाजिक चळवळ आणि लोकशाहीर परंपरेचे दर्शन घडवणारे विविध घटक समाविष्ट करण्यावर एकमत झाले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थित समाजबांधवांना विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून मार्गदर्शन करताना सांगितले की, हे स्मारक केवळ वास्तू न राहता येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल. समाजाच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैचारिक उन्नतीसाठी हे स्मारक दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
40 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लावल्याबद्दल उपस्थित सर्व समाजबांधवांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा जाहीर सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.
या बैठकीस नगरसेवक विलास (बापू ) लोंढे, दत्ता पेठे, माजी नगरसेवक बापू पवार, कानिफनाथ देवकुळे, अशोक पेठे, रॉबिन बगाडे,संतोष मोरे, युवराज शिंदे, बंडू अप्पा झोंबडे, शिवाजी गायकवाड, विलास रसाळ, सचिन लोंढे, काका पेठे, संभाजी कांबळे, अभिमान पेठे, त्रिंबक सूर्यवंशी, कुमार कांबळे, शंकर मोरे, खंडू चांदणे, अमोल पेठे, किसन पेठे तसेच इतर प्रमुख समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786
















