धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी…पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार
मुंबई,दि.३१ डिसेंबर : राज्यातील सर्व विमानतळांच्या विकासकामांमध्ये तसेच धोरणनिर्मितीमध्ये सुसूत्रता राहावी,या उद्देशाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.केंद्र शासनाची “उडान (RCS)” योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण केंद्र शासनासाठी नोडल एजन्सी म्हणून काम पाहते,तर राज्यात ही योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री तथा अध्यक्ष,महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या १९ व्या बैठकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित असलेली बारामती,लातूर,धाराशिव आणि यवतमाळ ही विमानतळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बारामती विमानतळ दि. १९/०८/२०२५ रोजी,धाराशिव विमानतळ दि.२०/०८/२०२५ रोजी, लातूर विमानतळ दि.२९/०८/२०२५ रोजी आणि यवतमाळ विमानतळ दि. १८/०९/२०२५ रोजी औपचारिकरित्या हस्तांतरित करण्याबाबत सामंजस्य करार केला आहे.यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
३० डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून बारामती विमानतळ,लातूर विमानतळ,धाराशिव विमानतळ व यवतमाळ विमानतळ ही विमानतळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने सदर विमानतळांचा विकास / विस्तार करावा, तेथे विमानसेवेसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व या विमानतळांची धावपट्टी विमानसेवेसाठी उपयुक्त / सुस्थितीत ठेवावी.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ही विमानतळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यात येत असली,तरी मूळ मालकी हक्क शासनाकडे कायम राहील.
बारामती,लातूर,धाराशिव व यवतमाळ विमानतळांबाबत भविष्यात राज्य शासन ज्या अटी व शर्ती विहित करेल किंवा जे धोरणात्मक बदल करेल ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला बंधनकारक असतील.
या निर्णयामुळे राज्यातील प्रादेशिक हवाई संपर्काला चालना मिळणार असून “उडान” योजनेअंतर्गत अधिक शहरांमध्ये विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या संदर्भात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले असून,धाराशिव विमानतळाचा विकास हा जिल्ह्याच्या औद्योगिक,शैक्षणिक,आरोग्य व पर्यटन विकासासाठी मैलाचा दगड ठरेल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो,” असे ते म्हणाले.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












