कला केंद्र – आत्महत्येला एक महिना उलटला तरीही प्रशासन गप्प… 31 डिसेंबरच्या मुहूर्तावर ‘छमछम’ – प्रवेशावर सील, पाठीमागुन सुरु!
धाराशिव, दि. ३१ डिसेंबर 2025 (प्रतिनिधी):धाराशिव जिल्ह्यात सील केलेली काही कला केंद्रे मागील दरवाजाने पुन्हा सुरू असून, ग्राहकांची वाहने हॉटेल, टपरी, बीअर बारसमोर पार्क केली जात आहेत. हा प्रकार प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचाच असल्याचे नागरिक सांगत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर 2025 रोजी या कला केंद्रांमध्ये मोठ्या आर्थिक व्यवहारांसह पूजन व जल्लोषात पुन्हा ‘कला केंद्र’ सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील साई कला केंद्राशी संबंधित प्रेमप्रकरणातून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केलेली घटना तब्बल एक महिन्यापूर्वी घडली असून, आजतागायत या प्रकरणाची कोणतीही चौकशी वा कारवाई प्रशासनाकडून झालेली नाही, ही बाब अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक ठरत आहे.
अश्रुबा अंकुश कांबळे (वय 39, रा. रुई, ढोकी) असे मृत तरुणाचे नाव आहे. साई कला केंद्रात काम करणाऱ्या महिलेशी त्याचे प्रेमसंबंध होते. सदर महिला सध्या बार्शी तालुक्यातील शेंदरी येथील ‘कमल कला केंद्र’ येथे कार्यरत असल्याची माहिती असून सदरील महिलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक महिन्यापूर्वी शिखर शिंगणापूर येथे देवदर्शनावरून परतताना दोघांत तीव्र वाद झाला. त्याच वेळी मृतकाच्या विवाहित पत्नीचा फोन आल्याने वाद अधिक चिघळला. रागाच्या भरात “मी आत्महत्या करतो” अशी धमकी दिल्यानंतरही दुर्लक्ष झाल्याने, रात्री उशिरा चोराखळी येथे गळफास घेऊन त्याने जीवन संपवले.
या घटनेनंतर येरमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस चौकशी, जबाबदारी निश्चिती किंवा कडक कारवाई झालेली नाही.
संबंधित महिला पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती असली तरी प्रकरण थंडावल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही पोलीस व महसूल प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
एका युवकाचा बळी गेल्यानंतरही महिनाभर प्रशासनाची शांतता आणि दुसरीकडे राजरोसपणे सुरू असलेली कला केंद्रे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून
“कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी व प्रशासन गप्प का?” असा थेट सवाल आता जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












