कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधला थेट संवाद; तातडीने पंचनामे व मदतकार्याचा आदेश
वाशी, दि. १६ ऑगस्ट २०२५ (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज जिल्ह्यातील वाशी, कळंबसह विविध भागांना भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली. यावेळी जिल्हा प्रशासनाला पुढील तीन दिवसांत पिकांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तेरणा व मांजरा नदीला पूर आला असून शेती, जनावरांचा चारा व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वाशी तालुक्यातील घोडकी येथे कृषी मंत्री भरणे यांनी थेट शेतात जाऊन, गुडघाभर पाणी व चिखलातून वाट काढत पिकांचे नुकसान पाहिले. तर खोंदला (ता. कळंब) येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. वाशी शहरातील पावसाचे पाणी दुकांमध्ये शिरल्याने झालेल्या मोठ्या नुकसानीचीही त्यांनी पाहणी केली.
यावेळी शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीसोबतच चाऱ्याची कमतरता, घरांचे नुकसान, तसेच कर्ज पुनर्नियोजन व विमा हप्ता माफीबाबत मंत्री महोदयांकडे मागण्या मांडल्या.
कृषी मंत्री भरणे यांनी प्रशासन, कृषी व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून मदतकार्य गतीमान करण्याचे आदेश दिले. तसेच विमा हप्ता माफी, पीक कर्ज पुनर्नियोजन, बियाणे व औषधांची उपलब्धता यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले.
“शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी संकटात आहे, अशा वेळी शासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. नुकसानभरपाई व आवश्यक मदत तातडीने पोहोचवली जाईल,” असे मंत्री भरणे यांनी सांगितले.
धाराशिव जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यात माजी आमदार राहुल मोटे, कृषी व महसूल अधिकारी उपस्थित होते. दौऱ्यादरम्यान बाधित शेतकऱ्यांशी कृषी मंत्र्यांनी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.













