संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा : डॉ.मृणाल जाधव
धाराशिव तालुक्यात विशेष आधार अपडेशन शिबिराचे आयोजन
धाराशिव : धाराशिव तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासून डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे दरमहा अनुदान वितरित केले जात आहे. मात्र, या प्रणालीत लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड अद्ययावत असणे, बँक खाते आधारशी सीड असणे आणि मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. मात्र त्यात काही तांत्रिक अडचणी होत्या त्या दुर करण्यासाठी धाराशिव तालुक्यात विशेष आधार अपडेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी केले आहे.
लाभार्थ्यांसाठी दि. 3 नोव्हेंबर व 4 नोव्हेंबर 2025 रोजी तहसील कार्यालय धाराशिव येथील संजय गांधी विभागात विशेष आधार अपडेशन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. लाभार्थी हे वयोवृद्ध किंवा दिव्यांग असल्याने त्यांचे बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचे स्कॅन न झाल्यामुळे डीबीटी प्रणालीवर नोंदणी करता आलेली नाही किंवा प्रमाणकीकरण प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. या शिबिराचा उद्देश तांत्रिक अडचणीत सापडलेल्या अशा लाभार्थ्यांना अनुदान वितरण प्रक्रियेत समाविष्ट करणे हा आहे. तसेच धाराशिव तालुक्यातील लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी आपल्या भागातील लाभार्थ्यांना माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, या शिबिरात लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, बँक पासबुक, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक तसेच ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास) घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. जाधव यांनी केले आहे.












