धाराशिव शहर पोलीस ठाण्यात मोठा आरोप – दारू प्रकरणात आर्थिक तडजोडीचा आरोप उघडकीस!
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन — संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
धाराशिव : धाराशिव शहर पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 486/2025 कलम 65 (म.दा.का.) अंतर्गत कारवाई दरम्यान मोठ्या आर्थिक गैरव्यवह झाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश प्रभाकर पाटील यांनी दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांना दिलेल्या निवेदनाद्वारे या प्रकरणाचा पर्दाफाश करीत कारवाईची मागणी केली आहे.
पाटील यांनी निवेदनामध्ये मागणी केली आहे की 17 ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ॲक्सिस बँकेसमोर इंडिगो कंपनीची पांढऱ्या रंगाची कार (क्रमांक MH24 EL 0072) दारूच्या चोरटी विक्रीसाठी जात असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने गाडी ताब्यात घेऊन विविध कंपनींच्या सीलबंद दारूच्या बाटल्या जप्त केल्या आणि शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
मात्र पाटील यांच्या तक्रारीनुसार सदर प्रकरणात मोठी आर्थिक तडजोड करून गाडी सोडण्यात आली असून, मुद्देमालातही मोठी तफावत दाखवण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित कर्मचाऱ्यांनी गुन्ह्यात जप्त झालेल्या दारूच्या प्रमाणात फेरफार करून आर्थिक लाभ घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
सदर कर्मचाऱ्याचे नाव विष्णू बेळे (पोलीस नाईक बक्कल नंबर 1197) असे असून, तो काही प्रभारी अधिकाऱ्यांच्या खास मर्जीतील असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, अशी चर्चा पोलिस ठाण्यातच सुरु असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.
पाटील यांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि पोलीस ठाणे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास संपूर्ण व्यवहार उघड होऊ शकतो. तसेच, संबंधित कर्मचाऱ्याचे सखोल चौकशी करून सत्यता उघड करण्याची मागणी करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्याच्या “लेडी सिंघम” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस अधीक्षक रितू खोकर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करतील का? तसेच, संपूर्ण घटनेत गुंतलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
याशिवाय,अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी एक गंभीर आरोप होत आहे की, संबंधित पोलीस ठाण्यातील काही अधिकारी नागरिक किंवा माध्यम प्रतिनिधींनी विरोधाचा आणि वस्तुस्थितीचा आवाज उठवला, तर त्यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करून अडकविण्याचे अघोषित आदेश दिल्याची चर्चा आहे. अशा प्रकारे सत्य उघड करणाऱ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
या सर्व घडामोडींमुळे धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिक आणि समाजसेवी संघटनांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
📍 धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्याकडे या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू करून भ्रष्टाचाराच्या साखळीला आळा घालण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786













