धाराशिवच्या राजकारणात भूकंप : आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे खंदे समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश
निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का संभाजी मामा सलगरांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश
धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे कार्यकर्ते व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक संभाजी (मामा) सलगर यांनी भाजपला रामराम ठोकत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे धाराशिवच्या राजकारणात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सलगर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आज आयोजित कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार व जिल्हा प्रमुख कैलास घाडगे पाटील तसेच माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर हे प्रमुख उपस्थित होते. सलगर यांचे राजकारणातील अनुभव, त्यांनी केलेले सामाजिक व प्रशासकीय कार्य आणि धाराशिव शहरात असलेला त्यांचा व्यापक प्रभाव लक्षात घेता शिवसेनेची ताकद अधिक वाढणार असल्याचे यावेळी नेत्यांनी स्पष्ट केले.
या पक्षप्रवेशानंतर आमदार कैलास घाडगे पाटील म्हणाले, “सलगर यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला नवी उर्जा आणि बळ मिळाले आहे. त्यांचा अनुभव व कार्याचा लाभ शिवसेनेला निश्चितच निवडणुकीत होईल.” तर राजकीय वर्तुळात हे पाऊल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात असून कार्यकर्त्यांमध्येही याबाबत चर्चा रंगल्या आहेत.
सलगर हे पूर्वीपासून भाजपचे कट्टर कार्यकर्ते व आमदार राणा पाटील समर्थक म्हणून ओळखले जात होते. शहरात त्यांचा दांडगा जनाधार असून अनेक कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या गोटात नाराजीची लाट उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय आगामी निवडणुकीत धाराशिव शहरातील राजकीय गणित बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
यामुळे धाराशिव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अधिक बळकट होण्याची चिन्हे स्पष्ट झाली असून धाराशिव शिवसेनेचे बालेकिल्ले होण्यासाठी वेळ लागणार नाही, असा विश्वास नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही हालचाल पुढे अनेक उमेदवारांच्या राजकीय भविष्यावर परिणाम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

Leave a Reply