धाराशिव, दि. २२(प्रतिनिधी): धाराशिव शहरात गणेशोत्सव काळात गणपती मूर्तींच्या आगमनासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक सांजा रोडमार्गे होते. या मार्गावर प्रचंड प्रमाणात वाहनांची गर्दी होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा आणि अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातून लहानसहान गल्लीबोळांमध्येही अडथळे निर्माण होऊन अपघात होण्याचा धोका वाढतो.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष मनोज रणधीर देशमुख यांनी वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. गणेशोत्सवात शहरात येणाऱ्या मूर्तींच्या वाहतुकीदरम्यान सांजा रोडवरील वाहतूक एक दिवसाकरिता पर्यायी मार्गावर बदलण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळपासून वाहतुकीचे मार्ग वळविण्याची आवश्यकता आहे त्यामुळे एस.टी बस तसेश इतर मोठ्या वाहनांना एस बी आय बँक समोरून वरुडा रोड उड्डाण पूल मार्गे भवानी चौक कडे वळवण्यात यावे तर तसेच भवानी चौकातून वरुडा रोड येथील उड्डाण पूल येथून एस.बी.आय बँक मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी वाहतूक सुरू ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे,
यामुळे शहरात होणारी वाहतूक कोंडी टळेल तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी होईल, असे देशमुख यांनी निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षकांना देण्यात आली असून वाहतूक व्यवस्थापनासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली आहे.












