धाराशिव (प्रतिनिधी) :धाराशिव शहरात भाजपच्या वतीने सध्या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचा धडाका सुरू आहे. सामान्य नागरिक राहत असलेल्या वस्त्यांमध्येच शिबिरे घेण्याचा आग्रह ठेवत कार्यकर्ते नियोजनात व्यस्त आहेत. मात्र शहरातील नगरपालिकेच्या एका शाळेत आयोजित होणारे आरोग्य शिबिर केवळ पत्रव्यवहाराच्या वादामुळे पुढे ढकलण्यात आले असल्याचे वृत्त विश्वसनीय सूत्रांकडून मिळाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या धाराशिव शहरातील प्रमुख जबाबदारी असलेल्या नेत्यानी कार्यकर्त्यांना नगर परिषद शाळेत शिबिर घेण्याचे नियोजन करण्यास सांगितले. कार्यकर्त्यांनी प्रचार करून नियोजित शाळेत कळविले असता तेथील मुख्याध्यापकांनी शिबिर घेण्यास हरकत नसल्याचे सांगितले, मात्र नगरपालिकेकडून लेखी परवानगी पत्र आणण्याची अट घातली.
यानंतर कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख नेत्याला घडलेला प्रकार सांगितला. संबंधित नेत्याने नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अनेकदा कॉल लावूनही प्रतिसाद मिळाला नाही. मेसेज पाठवूनही उत्तर न मिळाल्याने कार्यकर्त्यांत नाराजी उसळली. “आपण सत्तेत असूनही तुमचा फोन घेत नाहीत, मग सामान्य नागरिकांचे काय होईल?” असा सवाल कार्यकर्त्यांनी नेत्यांसमोर केला.धाराशिव शहरामध्ये मागील तीन चार दिवसांपासून याचीच खमंग सगळीकडे चर्चा ऐकावयास मिळत आहे
हतबल कार्यकर्त्यांनी पर्यायी शाळेत शिबिर घेण्याचा सल्ला दिला. परंतु, नेत्याने थेट नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना लेखी पत्र द्या, कस नाकारतात ते पाहू, असे आदेश दिले. मात्र, नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी गोलमाल उत्तर देऊन कार्यकर्त्यांना परत पाठवले. अखेर शिबिराचे आयोजन पुढे ढकलावे लागले असल्याचेही समजते.
या प्रकरणावर भाजप नेत्याची फजिती कार्यकर्त्यांसमोर झाली असून नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या वर्तनाबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे मुख्याधिकाऱ्यांची तक्रार करण्यात येणार असल्याचे कळते. शिबिर रद्द होण्यामागे नगरपालिकेचा अकार्यक्षम कारभार आणि नेत्यांचा दबाव न चालणे या दोन्ही बाबी स्पष्ट झाल्याने यावरून शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.












