धाराशिवमध्ये भाजपचे ‘मतदार माहिती संकलन अभियान’ सुरु
प्रत्येक मतदार कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा निर्धार — प्रभाग २० मध्ये विलास (बापू) लोंढे यांच्या नेतृत्वाखाली युवकांचे घराघर भेटीचे अभियान
धाराशिव दि. ९ (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने धाराशिव शहरात मतदार माहिती संकलन अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमातून शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून त्या त्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या, गरजा आणि अडचणी जाणून घेण्याचा संकल्प भाजपने केला आहे. शहरातील सर्व प्रभागांमधील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या अभियानासाठी दहा दिवसांचा कालावधी देण्यात आला असून, या काळात कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांची सविस्तर माहिती संकलित करत आहेत.
या माहितीमध्ये प्रत्येक कुटुंबातील सदस्यसंख्या, घरात कोणी आजारी आहे का, त्यांना कोणती अडचण आहे का, तसेच त्यांच्या परिसरातील नागरी समस्या जसे की पाणीपुरवठा, रस्त्यांची स्थिती, स्वच्छतेसंबंधी अडचणी यांचा समावेश आहे. संकलित माहिती धाराशिव येथील भाजप शहर कार्यालयात जमा करण्यात येणार असून, या डेटावर आधारित नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पक्षाच्या वतीने पुढील नियोजन केले जाणार आहे.
या उपक्रमाचा प्रारंभ झाल्यानंतर शनिवारी प्रभाग क्रमांक २० मधील साठेनगर भागात माहिती संकलन करण्यास सुरुवात झाली असून, आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. या प्रभागात विलास उर्फ बापू लोंढे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या युवक कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. स्थानिक नागरिकांकडून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी आपल्या वैयक्तिक तसेच परिसरातील समस्या यावेळी कार्यकर्त्यांसमोर मांडल्या आहेत.
संकलित माहिती पुढील दहा दिवसांत भाजप कार्यालयात जमा करण्यात येणार असून, त्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील आणि युवा नेते मल्हार पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील सर्व प्रभागांतील समस्यांवर आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी ठोस उपाययोजना आखल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या अभियानाबाबत बोलताना विलास (बापू) लोंढे यांनी सांगितले की, “भाजपचा हा उपक्रम केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून, प्रत्येक नागरिकाशी थेट संपर्क साधून त्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांचा विश्वास जिंकून त्यांच्या अडचणींवर उपाय शोधणे हेच आमचे ध्येय आहे.”
या उपक्रमातून धाराशिव शहरातील प्रत्येक मतदार कुटुंबाशी नाळ जोडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असून, जनतेच्या समस्या ओळखून त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याचा निर्धार या अभियानातून दिसून येत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


















