“शालेय पोषण आहारचा नळदुर्ग येथील दलाल मार्फत काळाबाजार पुन्हा सुरू…विद्यार्थ्यांच्या हक्काची लूट थांबणार का?”
धाराशिव दि. १३ (प्रतिनिधी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला शब्द “ना खाऊंगा, ना खाने दूंगा” हा संकल्प धुळ खाताना दिसत आहे. कारण गरीब विद्यार्थ्यांच्या जीवनदायी शालेय पोषण आहारासाठी शासनाकडून पुरवला जाणारा तांदूळ थेट काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या हक्काचा घास हिरावून दलालामार्फत काळया बाजारात खुलेआम विक्री होत असून, या गुन्ह्यात संबंधित विभागातील अधिकारी, ठेकेदार, वाहन चालक / मालक व काही शाळांच्या शिक्षकांचा सहभाग असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
शालेय पोषण आहार योजना विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी लागू असताना, या धान्याचा थेट काळया बाजारात प्रवास होत आहे. त्यामुळे हा प्रकार विद्यार्थ्यांच्या हक्कावर डाका टाकणारा गंभीर गुन्हा ठरत असून पालकांसह नागरिकांकडून “कठोर शिक्षा करा, विद्यार्थ्यांच्या हक्काची लूट थांबवा, काळा बाजारू माफियांना जेलमध्ये टाका” अशी जोरदार मागणी होत आहे.
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांनी धाडसी कारवाई करून हा काळाबाजार कारणांवर आळा घातला होता. मात्र, कालांतराने पुन्हा या काळाबाजाराचे डोके वर काढले आहे. बीड–भूम–बार्शी–नळदुर्ग या मार्गावरून काळाबाजाराचे मोठे जाळे सक्रिय झाल्याचे असून विशेष म्हणजे नळदुर्ग येथील एक मोठा “दलाल” हा या संपूर्ण घोटाळ्याचा मास्टरमाईंड असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
हा दलाल पाटोदा मोड येथून तांदळाचे पोते उचलून रातोरात गाड्यांमध्ये मालाच्या पत्त्यांचे अदलाबदल करून तात्काळ विल्हेवाट लावतो. नंतर स्वतःच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परवान्यावरून तो तांदूळ गोडाऊनमध्ये साठवून खुलेआम काळ्या बाजारात विकतो. मागील अनेक वर्षांपासून काही अधिकाऱ्यांना श्रीमिरी देऊन त्याने हा काळाबाजार फोफावला असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
या प्रकरणामुळे जिल्ह्यातील प्रशासनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, “लेडी सिंघम” म्हणून ओळख असलेल्या पोलीस अधीक्षक शफकत आमना, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मौनाक घोष यांच्यासमोर हे मोठे आव्हान आहे. जिल्ह्यातील पालकांसह नागरिकांकडून विचारले जाणारे प्रश्न हा काळाबाजार थांबविण्यासाठी तातडीने कठोर कारवाई होणार का?, पाटोदा मोड व नळदुर्ग मार्गे सुरू असलेली दलालांची साखळी उद्ध्वस्त होणार का?, दोषींना जेलमध्ये टाकून विद्यार्थ्यांचा हक्क खऱ्या अर्थाने सुरक्षित केला जाणार का?
पुढील भागात या घोटाळ्याची अधिक सविस्तर उकल होणार…
लोकमदत न्यूज – “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












