धाराशिव पोलिस दलातील तेजस्वी कामगिरी; मीनाक्षी माळी यांचा पोलीस महानिरीक्षकांकडून गौरव
धाराशिव येथील साजरा रोड परिसरातील रहिवाशी प्रवीण प्रमोद सूर्यवंशी (वय ३४) हे दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर कुटुंबीयांच्या तक्रारीवरून ३० नोव्हेंबर २०२५ रोजी मिसिंग क्र. ६७/२५ अशी नोंद धाराशिव पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
सूर्यवंशी हे जिल्हा परिषद विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत असून घरगुती मानसिक तणावामुळे त्यांच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता. याच कारणातून त्यांनी घर सोडल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर ते पुणे, मुंबई, गोवा, वडोदरा व कोल्हापूर या विविध शहरांमध्ये फिरत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
या गंभीर प्रकरणाचा तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मीनाक्षी शिवाजी माळी/६२६ यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण व जबाबदारीने हाती घेतला. त्यांनी तांत्रिक विश्लेषण, संपर्क सूत्रांचा मागोवा आणि मानसशास्त्रीय पद्धतीचा वापर करत संबंधित व्यक्तीचा शोध लावला. केवळ शोधच नव्हे तर योग्य समुपदेशन करून सूर्यवंशी यांचे मानसपरिवर्तन घडवून त्यांना सुखरूपपणे कुटुंबाकडे परत आणण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
यानंतर संबंधित व्यक्तीला पोलीस ठाण्यात हजर करून सदर मिसिंग प्रकरण यशस्वीरित्या निकाली काढण्यात आले. या कारवाईमुळे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून शहरातील नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त केले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे सन २०२५ मध्ये धाराशिव पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या एकूण ७२ मिसिंग प्रकरणांपैकी तब्बल ६३ प्रकरणांचा शोध घेऊन यशस्वीरित्या निकाली काढण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या आकडेवारीतून धाराशिव पोलिसांची तत्परता, कार्यक्षमता व सामाजिक बांधिलकी अधोरेखित होते.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष वीरेंद्र मिश्र छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मीनाक्षी शिवाजी माळी यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक रितू खोखर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












