आनंदनगर हद्दीत पत्त्याच्या क्लबचा पुन्हा धुमाकूळ? उच्चभ्रू वसाहतीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
राजकीय वरदहस्ताचा आरोप पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, नागरिकांची मागणी!
धाराशिव | लोकमदत न्यूज
धाराशिव शहरातील आनंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत बंद करण्यात आलेले अवैध धंदे पुन्हा डोके वर काढत असल्याची गंभीर चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे. आनंदनगर परिसरातील एका मंगल कार्यालयाच्या पाठीमागील भागात, असलेल्या एका उच्चभ्रू वसाहतीशेजारी असलेल्या शेतातील शेडमध्ये मोठ्या प्रमाणात पत्त्याचा क्लब सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या ठिकाणी २४ तास जुगार सुरू असल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे परिसरात संशयित व्यक्तींची वर्दळ वाढली आहे. परिणामी, शेजारील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना रात्री बाहेर पडताना असुरक्षित वाटत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सदर पत्त्याचा क्लब हा शहरातील एका राजकीय पक्षाशी संबंधित लोकप्रतिनिधीच्या आश्रयाखाली सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. संबंधित व्यक्तीवर यापूर्वीही जुगार प्रकरणी गुन्हे दाखल झाल्याची चर्चा असली तरी राजकीय वरदहस्तामुळे कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
या क्लबमध्ये शहरातील काही नामांकित व्यापारी, उद्योजक आणि व्यावसायिक येत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव आणला जात असल्याची कुजबूज परिसरात सुरू आहे. मात्र, या प्रकरणात अधिकृत तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येण्यास धजावत नसल्याचे वास्तव आहे.
नागरिकांकडून स्पष्ट मागणी केली जात आहे की, पोलिस प्रशासनाने स्वतःहून पुढाकार घेऊन या पत्त्याच्या क्लबवर धाड टाकावी, जुगार खेळणाऱ्यांवर तसेच आयोजकांवर कठोर कारवाई करावी आणि बंद करण्यात आलेले अवैध धंदे पुन्हा सुरू होऊ नयेत यासाठी ठोस पावले उचलावीत.
परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. आता पोलिस प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786











