कर्तव्यदक्ष प्रशासक वसुधा फड यांना पदोन्नती — धाराशिवनंतर लातूर महापालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती
धाराशिव दि.०५(अमजद सय्यद):शहर विकासासाठी समर्पित कार्यशैली आणि प्रभावी प्रशासकीय नेतृत्व यामुळे ओळखल्या जाणाऱ्या श्रीमती वसुधा फड यांची पदोन्नतीने लातूर महानगरपालिका उपायुक्त (निवड श्रेणी) म्हणून बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या शासन आदेशानुसार ही पदोन्नती मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती फड या महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील गट-अ अधिकारी असून, धाराशिव नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. शहरातील विविध विकासकामांना गती देताना त्यांनी अधिकारी-कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांमध्ये समन्वय साधत प्रशासकीय पातळीवर पारदर्शकता निर्माण केली.
धाराशिव नगरपरिषदेतील त्यांच्या कार्यकाळात शहरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या. नागरिकांचा विश्वास जिंकून, टीमवर्कच्या माध्यमातून विकासाला दिशा देणाऱ्या कर्तव्यदक्ष प्रशासक म्हणून त्या ओळखल्या जातात.
त्यांच्या या उत्तम कार्यकौशल्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना पदोन्नती देत लातूर महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून नेमणूक केली आहे. हा निर्णय त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्वाचा टप्पा असून महाराष्ट्र राज्यपालांच्या अधिनियमाने शासन प्रियंका कुलकर्णी (उपसचिव, नगर विकास विभाग) यांनी बदलीचे आदेश काढले आहेत.
धाराशिवमधील अधिकारी व कर्मचारीवर्गात वसुधा फड यांच्या बदलीबाबत आनंद आणि अभिमानाचे वातावरण असून, “कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी नेहमीच लोकहिताला प्राधान्य दिले” अशी प्रतिक्रिया धाराशिव नगर परिषद येथील तत्कालीन अधिकारी आणि विद्यमान अधिकारी कर्मचारी यांनी व्यक्त केली आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












