अनुदान वितरणात दिरंगाई शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या..फार्मर आयडी प्रलंबित, अनेकांना लाभ नाकारला… खासदार व आमदारांचा जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद
धाराशिव (प्रतिनिधी) — जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे शेतकरी अनुदान अतिशय संथ गतीने जमा होण्यास सुरुवात झाली असून, या संदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी समोर येत आहेत. सरकारने दिवाळीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होईल, अशी घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत.
अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित असल्याने अनुदान वितरण प्रक्रियेत अडथळे येत असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
बैठकीदरम्यान शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शासन यंत्रणेने तातडीने उपाययोजना कराव्यात, पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान वितरित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
खासदार आणि आमदारांनी सांगितले की, “शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. त्यांच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी आम्ही नेहमीच सज्ज आहोत. शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येक रुपया पोहोचेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.” असे खासदार आणि आमदार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.












