धाराशिव बसस्थानकाचे उद्घाटन अर्धवट, सहा महिने उलटूनही काम अपुरेच – पालकमंत्री सरनाईकांसह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षावर प्रवाशांमधून संताप!
धाराशिव दि.०३(अमजद सय्यद):महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे त्यांच्या धडाकेबाज कामकाजाच्या शैलीसाठी राज्यभर प्रसिद्ध आहेत. एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी घेतलेले अनेक निर्णय स्वागतार्ह ठरले असून त्यात प्रामुख्याने पगारविषयक प्रश्न सोडवणे, आषाढी वारीत कर्मचाऱ्यांची भोजनव्यवस्था, कर्मचाऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना अशा कामामुळे त्यांचे कौतुक होत आहे. मात्र परिवहन मंत्री सरनाईक ज्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत, त्या धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या बसस्थानकाच्या बाबतीत मात्र गंभीर की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांसह कर्मचारी व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
एक मे रोजी पालकमंत्र्यांनी मोठ्या थाटात त्यांनी धाराशिव शहरातील बसस्थानकाचे उद्घाटन केले. मात्र त्यांनी बस स्थानकाचे काम किती झाले आहे याची साधी पाहणी देखील केली नाही हे विशेष, त्यावेळी केवळ ५० ते ६० टक्केच काम पूर्ण झाले होते. प्रवाशी,नागरिक व स्थानिक संघटनांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. उद्घाटनावेळीच पालकमंत्र्यांनी अपूर्ण काम असतानाही गडबडीत लोकार्पण करण्याचा घाट का घातला असा आरोप करण्यात येत आहे. उद्घाटनानंतरही सहा महिने उलटून गेले तरी बसस्थानकाचे काम अद्याप अपूर्ण आहे.
पत्रकारांनी वारंवार या विषयावर विचारणा केली असता अर्धवट आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे माझ्या हस्ते उद्घाटन केले “हे माझे दुर्दैव” असे म्हणत या प्रकरणी चौकशी समिती नेमल्याचे पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले होते. मात्र आजपर्यंत ती चौकशी समिती अस्तित्वातच नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे दोषींवर कोणतीही कारवाई न झाल्याने या संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
प्रवाशांसह नागरिकांनी आरोप केला की, उद्घाटनानंतर बसस्थानकात बोगस कामे सुरू असून प्रामुख्याने प्युअर ब्लॉक, काँक्रीटेकीकरण दर्जाहीन साहित्य याकडे एस.टी. महामंडळाचे अधिकारी आणि पालकमंत्री यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आजही बसस्थानकात अकाउंट सेक्शन व कॅशियर विभाग जीर्ण झालेल्या पडीक इमारतीमधूनच चालतो. त्यामध्ये प्रामुख्याने रात्री बेरात्री पुरुष / महिला कर्मचाऱ्यांना असुरक्षित वातावरणात काम करावे लागत असून, तिथे जनावरे, कुत्रे, साप यांचा राजरोस वावर आहे मात्र याकडे राजकीय नेत्यांसह अधिकाऱ्यांचे लक्ष देण्यासाठी कोणाचेही धाडस होताना दिसत नाही.
दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पुरुष कर्मचारी यांच्या विश्राम कक्षात पाणी व वीज पुरवठ्याची सोय नाही. बसस्थानकाच्या वरती दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असूनही प्रशासन व पालकमंत्री याकडे दुर्लक्ष करत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या बसस्थानकाकडे पालकमंत्र्यांनी आजवर पुन्हा भेट दिलेली नाही. उलट प्रत्येक दौऱ्यात त्यांनी शिंगोली येथील फॉरेस्ट पार्कला भेट दिली मात्र बसस्थानकाविषयी अनास्थाच दाखवली.
यावेळी प्रवाशांनी प्रश्न उपस्थित केला आहे की उद्घाटना नंतर पालकमंत्र्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले, तर सहा महिन्यांनंतरही कारवाई का झाली नाही? पालकमंत्र्यांचे आदेशच अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत का? यात कुणाचा तरी आश्रय आहे?
आजही बसस्थानकाचे काम अपूर्ण असून प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांचे हाल, महिला कर्मचाऱ्यांची असुरक्षितता आणि सुरू असलेले दर्जाहीन काम पाहता पालकमंत्र्यांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यात इतर ठिकाणी बसस्थानकांचे दौरे करणारे पालकमंत्री, सरनाईक यांनी पालकत्व स्वीकारलेल्या आपल्या जिल्ह्यातील उद्घाटन केलेल्या बसस्थानकाचीच स्थिती जाणून घेत नाहीत, ही बाब नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे “पालकमंत्री खरोखरच कर्तव्यदक्ष आहेत का? की केवळ दिखावा करतात?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींवरही प्रश्नचिन्ह!
फक्त पालकमंत्रीच नव्हे तर स्थानिक लोकप्रतिनिधीही या प्रकरणात तेवढेच दोषी असल्याचा नागरिक आरोप करत आहे. इतर वेळेस “आम्ही जनतेसाठी २४ तास काम करतो, नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतो” असे सांगत स्टंटबाजी करणारे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते, बसस्थानकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मात्र पुढे येत नाहीत. आंदोलने, पत्रकार परिषद, श्रेय घेण्याची स्पर्धा टक्केवारी आणि आर्थिक विषयांवरच का केली जाते, हा सवाल प्रवाशा मधून उपस्थित केला जात आहे.
उद्घाटनावेळी फोटोंसाठी आणि श्रेय घेण्यासाठी पुढे धावणारे हेच लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते, आज जेव्हा बसस्थानकातील काम अपूर्ण असून प्रवासी-कर्मचारी हाल सोसत आहेत, तेव्हा मात्र कुठेच दिसत नाहीत. नागरिकांचा रोष आहे की, निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे आणि दुर्लक्षाचे पालकमंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्तेही तेवढेच दोषी आहेत.
“जेव्हा श्रेय घेण्याची वेळ येते, तेव्हा राजकारणी व कार्यकर्ते पुढे पुढे दिसतात, मग धाराशिव बसस्थानकाच्या कामाविषयी चौकशीची मागणी का करत नाहीत? या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाला जबाबदार कोण?” असा उलट सवाल नागरिक करीत आहेत.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786















