धाराशिव निवडणूक 2025 : प्रभाग 17 मध्ये ‘सर्वसामान्य कार्यकर्ता विरुद्ध प्रोफेशनल नेता’ थेट लढत!
धाराशिव (प्रतिनिधी) :धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 17 मध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता विरुद्ध प्रोफेशनल (व्हि.आय. पी.) “नेता” अशी थेट लढत रंगत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. 2017 च्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर तब्बल दहा वर्षे राजकारणातून गायब असलेले “एक” प्रोफेशनल नेते आता अचानक “नागरिकांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवत आहे” असा केविलवाणा आव आणत प्रभागांत प्रचारात उतरले असल्याचा दावा नागरिकांतून करण्यात येत आहे. दहा वर्षांचा अज्ञातवासानंतर त्यांचे हे अवतरण नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत असून, खाजा नगर परिसरात “यांना आता जनता योग्य धडा शिकवणार” अशा चर्चा गाजू लागल्या आहेत.
दुसरीकडे, प्रभागातील सर्वसामान्य कार्यकर्ता प्रशासन राजवटीत देखील घरी न बसता नागरिकांच्या कामासाठी 24 तास तयार असल्याची प्रतिमा दृढ झाली आहे. मागील चार वर्षांपासून नगरपालिकेमध्ये प्रशासक राज्य असतानाही त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या अनेक तक्रारी शासनदरबारी सोडवल्याचा ठसा उमटवला. तसेच खाजा नगरमधील मुख्य रस्त्यांचे काम, नाल्यांची दुरुस्ती, पथदिवे बसविणे आणि इतर नागरी समस्या मार्गी लावणे या उल्लेखनीय कामांमुळे त्यांच्याबद्दल समाधानाचा सूर प्रभागात ऐकू येत आहे.
याउलट, नेहमीच नागरिकांपासून दूर राहून, फक्त निवडणुकीच्या तोंडावरच दर्शन देणाऱ्या प्रोफेशनल नेत्यांविषयी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. “पाच वर्षांत लोकांना वेळ नाही, आणि निवडणुकीला अचानक लोकसेवा आठवते? अशांना आम्ही या वेळी थारा देणार नाही,” असे मत अनेक मतदार व्यक्त करत आहेत. निवडणुकीपुरता नेता नको, कायम जनतेत राहून काम करणारा सर्वसामान्य युवा कार्यकर्ता हवा, असा स्पष्ट स्वर प्रभाग क्रमांक 17 मधील मतदारांमध्ये उमटू लागला आहे.
यामुळेच या प्रभागातील निवडणूक आता काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता विरुद्ध निवडणुकीपुरता प्रोफेशनल नेता अशी रंगणार असून, जनतेचा कौल या वेळेस कोणासाठी ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












