धाराशिव पूरस्थितीचा आढावा : उपमुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री सरनाईक व आमदार सावंत यांचा शेतात थेट दौरा
कारंजा (ता. परांडा) दि. २४ सप्टेंबर –
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक तसेच माजी मंत्री व भूम-परांडा-वाशी विधानसभा क्षेत्राचे आमदार तानाजीराव सावंत यांनी आज परांडा तालुक्यातील कारंजा येथून पाहणी दौऱ्याची सुरुवात केली.
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके उध्वस्त झाली असून अनेकांचे घरसुद्धा कोसळले आहेत. ही परिस्थिती प्रत्यक्ष पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे व मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत नुकसानग्रस्त शेती व घरांची माहिती घेतली.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करून त्वरित उपाययोजना राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. “शेतकरी बांधवांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, सरकार तुमच्या पाठीशी आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपले दुःख, अडचणी आणि मदतीच्या अपेक्षा थेट उपमुख्यमंत्री शिंदे पालकमंत्री सरनाईक यांच्यासमोर मांडल्या.
लोकमदत न्यूज
संपादक अमजद सय्यद 8390088786












