धाराशिव नगरपालिका निवडणूक 2025 : बंडखोरी रोखण्यासाठी भाजपाची गुप्त रणनीती – नगराध्यक्ष पदासाठी नवीन चेहऱ्याची चर्चा!
धाराशिव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी बिगुल वाजला असून उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस सोमवारी (17 नोव्हेंबर) आहे. याआधीच शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजपाने यंदाच्या निवडणुकीत बंडखोरी पूर्णपणे रोखण्यासाठी कमालीची गुप्तता पाळल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. धाराशिव नगरपालिकेत एकूण 20 प्रभाग असून, यंदा 41 नगरसेवकांची निवड होणार आहे. त्यापैकी प्रभाग क्रमांक 19 हा तीन नगरसेवकांचा मोठा प्रभाग आहे. प्रत्येक प्रभागात दोन ते चार, तर काही ठिकाणी सहा-सहा इच्छुक उमेदवार उभे राहत असल्याने भाजपाने या वेळी उमेदवार निवड प्रक्रियेत पूर्ण गोपनीयता अवलंबली आहे.
सूत्रांनुसार, भाजपाने सर्व इच्छुकांना ‘पक्षाचे नाव लिहूनच उमेदवारी अर्ज दाखल करावेत’ असा कडक आदेश दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत एकाही कार्यकर्त्याने किंवा इच्छुकाने अपक्ष म्हणून अर्ज भरू नये, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली असून, भरलेले अर्ज देखील थेट भाजपाच्या धाराशिव कार्यालयात जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. यामुळे कोण उमेदवार म्हणून पुढे येईल, याबाबत पक्षातून कोणतीही माहिती बाहेर येऊ नये, असा हेतू स्पष्ट दिसून येतो.
दरम्यान, AB फॉर्मही पक्षाकडून अंतिम क्षणी म्हणजे सोमवारीच दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अंतिम क्षणापर्यंत कोणालाही अधिकृत उमेदवारी दिली जाणार नसल्याने शहरातील इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे. अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी पक्षाच्या वरिष्ठांकडे मुलाखती दिल्या असल्या तरी, मुलाखत दिलेल्या कोणत्याही इच्छुकाला उमेदवारी मिळणार नसून भाजपाकडून पूर्णपणे नवीन आणि स्वच्छ प्रतिमेचा चेहरा नगराध्यक्ष म्हणून आणण्यात येणार, अशी मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सर्वसमावेशक, निष्कलंक आणि जनतेत मिसळून काम करणाऱ्या व्यक्तीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याचा विचार पक्षात सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.
भाजपाने या वेळी बंडखोरीला पूर्णविराम देण्यासाठी आधीच नियोजनबद्ध पद्धतीने रणनीती राबवली असून, धाराशिव नगरपालिकेत भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे सूत्रांतून समजते. पक्षातील सर्व इच्छुक उमेदवारांना पक्षाचे नाव लिहूनच अर्ज दाखल करण्याचे आदेश, अर्ज BJP कार्यालयात जमा करण्याची सक्ती, आणि AB फॉर्म शेवटच्या क्षणी दाखल करण्याची तयारी या सगळ्या घडामोडींमुळे भाजपाचा निवडणुकीचा गुप्त डाव अधिक स्पष्ट होत आहे. नगराध्यक्षपदासाठी नवीन चेहऱ्याची शक्यता आणि पक्षाची गुप्त रणनीती यामुळे धाराशिवच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












