धाराशिव नगर परिषद प्रभाग क्रमांक ४ : तात्पुरत्या नेत्याचा पुन्हा एकदा “घुमाकुळ” सुरू!
निवडणूक जाहीर होताच पुन्हा सक्रिय झाले स्वयंघोषित कार्यकर्ते, पण जनता सजग!
धाराशिव दि११(प्रतिनिधी):धाराशिव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होताच काही तात्पुरते स्वयंघोषित नेते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मागील एक ते दोन वर्षांपूर्वी निवडणुकीची घोषणा होताच “समाजसेवा” करण्याचा आव आणत फोटोसेशन आणि नावीन्यपूर्ण कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न या नेत्यांनी केला होता.
त्या काळात मुरूम टाकणे, रस्त्यांवर लाईट बसवणे, उद्यान विकसित करणे, वृक्षारोपण व विविध सामाजिक उपक्रमांमध्ये केवळ दिखाऊ सहभाग घेत या नेत्यांनी प्रभागात आपली उपस्थिती दाखवली होती. मात्र, निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्याचे समजताच हे सर्व “तात्पुरते समाजसेवक” अचानक गायब झाले. जवळपास दोन वर्षांपासून या प्रभागात त्यांनी पायही टाकला नाही.
दरम्यान, नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले — पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचून घरांमध्ये पाणी शिरणे, रस्त्यांची दुरवस्था, प्रकाशव्यवस्थेचा अभाव, आणि मूलभूत सुविधांची कमतरता अशी अनेक संकटे आली, पण या स्वयंघोषित नेत्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले.
आता मात्र, निवडणूक आयोगाने पुन्हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर हेच नेते पुन्हा एकदा कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊ लागले आहेत. सोशल मीडियावर फोटो, रील्स, आणि प्रचारात्मक पोस्टद्वारे हे नेते पुन्हा आपल्या “लोकसंपर्क” दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
मात्र या वेळी प्रभाग क्रमांक चारमधील जनता सजग आणि जागरूक आहे. “फक्त निवडणुकीच्या काळात समाजसेवेचा दिखावा करून मत मागणाऱ्या अशा तात्पुरत्या नेत्यांना जनता यावेळी योग्य धडा शिकवेल,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली आहे.
प्रभागातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, खरा समाजसेवक तोच जो निवडणूक असो वा नसो, सतत जनतेच्या अडचणींमध्ये सोबत उभा राहतो. त्यामुळे या निवडणुकीत “तात्पुरत्या नेत्यांचा” चमकदार शो जनता नक्कीच नाकारेल, असा सूर सर्वसामान्य मतदारांमध्ये ऐकू येत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












