मराठा समाजाच्या मागणीचा विचार करून शासनाने लवकर निर्णय
मुंबई दि३१ (प्रतिनिधी):मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही शासनाकडे ठाम मागणी लावून धरणार आहोत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागणीचा विचार करून शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी धाराशिव युवासेना लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील केली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना (शिंदे गट) युवासेना लोकसभा अध्यक्ष आनंद (तात्या) सतीशराव पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
मनोज जरांगे पाटील हे मागील चार दिवसांपासून आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले असून, मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर उपोषण सोडणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या उपोषणाला राज्यभरातून मोठा जनसमर्थन मिळत असून, समाजातील विविध संघटनाही पाठिंबा दर्शवत आहेत.
या पार्श्वभूमीवर धाराशिवचे युवासेना लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील यांनी आझाद मैदान येथे उपस्थित राहून जरांगे पाटील यांना भेट दिली. त्यांनी उपोषणास जाहीर पाठींबा दर्शवला आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नेहमीच संघर्षाच्या मैदानात राहू, असे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना आनंद पाटील म्हणाले की, “मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही शासनाकडे ठाम मागणी लावून धरणार आहोत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठा समाजाचा प्रचंड पाठिंबा आहे. राज्य सरकारने ही मागणी तातडीने मान्य करून समाजाला न्याय द्यावा.”
या भेटीमुळे जरांगे पाटील यांच्या उपोषणाला धाराशिव जिल्ह्यातूनही राजकीय आणि सामाजिक पातळीवर बळकटी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.












