धाराशिव दि.१२(अमजद सय्यद):मागील दोन ते तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीत धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठरले आहे.
यापूर्वीच्या कार्यकाळात सुरुवातीचे अडीच वर्षे अध्यक्षपद अनुसूचित जाती-जमातीच्या महिलांसाठी राखीव होते, तर पुढील अडीच वर्षे हे ओबीसी पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेवर प्रशासकिय राज्य लागू झाले. परिणामी, अनेक विकासकामांना गती मिळू शकली नाही.
आता मात्र आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे जिल्हा परिषदेवर पुन्हा लोकप्रतिनिधींचे राज्य येणार हे निश्चित झाले आहे. लवकरच निवडणुकीचा बिगुल वाजणार असून, प्रशासकिय राज्याची समाप्ती होणार आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील मतदारसंघात नवे राजकीय समीकरण घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्यामुळे जिल्ह्यातील मातब्बर नेते आता आपल्या पत्नींसाठी उमेदवारी मिळवून देण्यासाठी हालचाली करत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आगामी निवडणुकीनंतर जिल्हा परिषद अध्यक्षपद कोणाकडे जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच धाराशिव जिल्ह्याच्या आरक्षण सोडतीनंतर राजकीय पक्ष व गटांनी प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला रंगतदार वळण मिळणार असून, विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा जिल्ह्यातील नागरिक व्यक्त करत आहेत.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












