धाराशिव (प्रतिनिधी) – शहरामध्ये मागील काही दिवसांपासून गुपचूप सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर–सोलापूर महामार्गावरील एका हॉटेलच्या मागील भागात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सदरील ठिकाणी आठ ते दहा जण पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. या कारवाईदरम्यान काही वाहनांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. आश्चर्य म्हणजे या क्लबमध्ये शहरातील काही प्रतिष्ठित नागरिक सहभागी असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक माहिती समोर येत आहे.
कारवाईनंतर धाराशिव शहर पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी जमा झाली असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहरात मागील काही दिवसांपासून अशा क्लबना पुन्हा ऊत आला होता. पोलीस अधीक्षक रितू खोकर रजेवर गेल्याबरोबर या क्लबना हळूहळू बळ मिळत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र दुसऱ्या लेडी सिंघम म्हणून ओळखले जाणाऱ्या अप्पर पोलिस अधीक्षक शफाकत आमना यांनी स्वतंत्र पथक पाठवून सदर ठिकाणी सुरू असलेल्या क्लब वर धाड टाकून जिल्ह्यामध्ये अवैध धंदे चालू देणार नसल्याचे परत एकदा दाखवून दिले आहे.
या क्लबना कोणाचा आश्रय व पाठबळ होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, “डॅशिंग” म्हणून ओळख असलेले अपर पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांनी स्वतंत्र पथक पाठवून कारवाई केली असल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद” संपादक अमजद सय्यद












