धाराशिव शहरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक; दहा जण ताब्यात, तब्बल 10.58 लाखांचा मुद्देमाल जप्त — शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
धाराशिव दि.१९(प्रतिनिधी):धाराशिव शहरात अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (18 ऑगस्ट) रात्री भवानी चौक ते अहिल्यादेवी होळकर चौक रस्त्यावर नॅशनल हायवे-52लगत असलेल्या गाझी हॉटेल शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर प्रभारी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली. मंगळवारी पहाटे 1.00 वाजता धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 396/2025 भादंवि नव्हे तर थेट महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4, 5 अंतर्गत नोंद झाला असून, दहा संशयितांना ताब्यात घेऊन एकूण 10,58,185 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई धाराशिव जिल्ह्यामध्ये लेडी सिंघम म्हणून ओळखले जाणारे प्रभारी पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथकाने केली असल्याने, “धाराशिव शहर पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी व कर्मचारी आणि बीट अंमलदार करतात तरी काय?” असा सवाल शहरात जोर धरत आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, 18 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8.20 वाजता पत्र्याच्या शेडमध्ये काही जण वर्तुळ करून तिरंट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक शाफाकत आमना यांच्या स्वतंत्र पथकाने सापळा रचून धाड टाकली. यात सर्फराज मक्सुद कुरेशी, जुबेर जमील शेख, श्रीकांत बाबासाहेब शिंदे, पाश कम पटील, अजमतुल्ला जब्बार शेख, अमोल प्रकाश देढे, अलिम करम सय्यद, सागर मारुती भांडवले, आबेद अब्दुल करीम शेख आणि रविंद्र मैंदाड (सर्व रा. धाराशिव) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्याठिकाणाहून पत्त्यांचे संच, रोख रक्कम, विविध मोबाईल फोन्स, एटीएम कार्डे, पाच दुचाकी आणि एक कार असा मोठा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. विशेष म्हणजे, रविंद्र मैंदाड याच्याकडून एकूण 6,58,790 रुपयांचा मुद्देमाल मिळाला असून यात मारुती सुझुकी इर्टिगा (MH-25 AS-6886) कारचाही समावेश आहे. इतरांकडून हाँडा शाईन (MH-25 AU-6485), जिक्सर (MH-25 AE-7660), एचएफ डिलक्स (MH-12 NT-1268), स्लेंडर प्लस (MH-13 AD-4453) या दुचाक्या, तसेच सॅमसंग, रेडमी, विवो, ओप्पो, अॅपल अशा कंपन्यांचे मोबाईल व विविध मूल्यांच्या नोटा जप्त झाल्या. फिर्याद पोहेकॉ स्वप्नदिप उद्वराव भोजगुडे (वय 38, ब.क्र. 1392, वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव) यांनी दिली असून पुढील तपास पोना 1871 क्षिरसागर करत आहेत. गुन्हा नोंदविण्याची कारवाई पोहेकॉ 706 कुंभार यांनी केली. सदरील कारवाई सपोनि हिंगोले सपोनि वाचक शाखा यांच्या सह वाचक शाखेचे कर्मचारी सहभागी होते.
ही धडक कारवाई प्रभारी पोलिस अधीक्षक शफाकत आमना यांच्या स्वतंत्र पथकाने पार पाडल्याने शहरात सर्रास सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर—विशेषतः जुगार अड्ड्यांवर—स्थानिक पोलिसांची पकड आणि देखरेख कितपत परिणामकारक आहे, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात जुगाराचे अड्डे इतक्या सुलभ पद्धतीने चालत असतील तर धाराशिव शहर पोलीस ठाण्यातील काहींच्या “आशीर्वादाने” हे सुरू होते का? असा जनतेत कुजबुज सुरू असून, कोणाचे पाठबळ होते का? अधिकाऱ्यांच्या खास मर्जीतील साइडपोस्ट घेऊन पत्त्याच्या क्लबला पाठबळ देणाऱ्या आणि “मुंगळा” बनवून गुळ खाणाऱ्या कर्मचाऱ्याचा शोध घेण्यासाठी विभागीय चौकशी गरजेची असल्याची मागणीही आता जोर धरत आहे. यासंबंधी अधिकृतरीत्या कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नसला तरी, नागरिकांच्या तक्रारी आणि या धडक कारवाईनंतर उफाळलेल्या चर्चांमुळे शहर पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, विशेष पथकाने जप्त केलेल्या मुद्देमालाचा पंचनामा करून तो धाराशिव शहर पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि समाजविघातक प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी डॅशिंगबाज असलेले प्रभारी पोलिस अधीक्षक शफाकत आमना यांनी या पुढेही अशा कारवाया सुरूच ठेवाव्यात अशी मागणी होत आहे,
मात्र, जुगार अड्ड्याला स्थानिक स्तरावरून पाठबळ होते का, माहिती असूनही कारवाईला विलंब का झाला, आणि शहरात इतर ठिकाणीही असे अड्डे सक्रिय आहेत का, यासंबंधी नागरिकांची शंका निवळेपर्यंत सार्वजनिक विश्वास पुनर्संचयित होणे कठीण असल्याचेही शहरात म्हटले जात आहे.
या प्रकरणात नोंदविलेला गुन्हा क्र. 396/2025 (धाराशिव शहर पोलीस ठाणे) असून, महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 व 5 प्रमाणे पुढील कठोर कायदेशीर कारवाई अपेक्षित आहे. प्रकरणाचा सखोल तपास होऊन जबाबदारी निश्चित व्हावी आणि धाराशिव शहरातील जुगार अड्ड्यांना “पाठबळ” देणाऱ्यांचे धागेदोरे उलगडावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद” संपादक अमजद सय्यद 8390088786











