राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा रस्ता होणार अतिक्रमण मुक्त
धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी):सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६८ (पाटस–दौंड–बार्शी–धाराशिव–बोरफळ) मार्गावरील धाराशिव शहरातील महत्त्वाच्या भागातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच बसस्थानक कॉर्नर ते सांजा गाव या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमण हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरू आहे.
सध्या सुरू असलेली अतिक्रमण काढण्याची मोहीम ही तात्पुरती थंडावलेली असून १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानंतर या मोहिमेला विशेष गती देण्यात येणार असून, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मोरे यांनी केले आहे. अन्यथा, जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटवून संबंधित जागा मोकळी करण्यात येणार आहेत.
मोरे यांनी सांगितले की, शहरातून जाणाऱ्या या महत्त्वाच्या आणि मुख्य भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या सुयोग्य रुंदीकरणासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अतिक्रमणमुक्ती आवश्यक आहे. त्यामुळे जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सांजा या दोन्ही मार्गावरील नागरिकांनी सा. बा.विभागाच्या हद्दीत आलेले अतिक्रमण स्वतः होऊन त्वरित काढून घ्यावे अन्यथा ते जेसीबी द्वारे काढून टाकण्यात येईल असे कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
“मोठ्या मार्गासाठी व शहराच्या विकासासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे अतिक्रमण न काढणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.












