बुधवारी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक…सहा महिन्यांपासून ठप्प विकासाला मिळणार गती?
धाराशिव दि.१२ (प्रतिनिधी) :धाराशिव जिल्ह्याची बहुचर्चित जिल्हा नियोजन समितीची बैठक अखेर सहा महिन्यांच्या अंतराने होणार आहे. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही बैठक पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
या बैठकीत १ मे २०२५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त आणि त्यावरील कार्यवाहीचे अनुपालन यास मान्यता देण्याबरोबरच सन २०२५-२६ च्या जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना) माहे सप्टेंबर २०२५ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच पालकमंत्री यांच्या परवानगीने आयत्या वेळेच्या विषयांवरही चर्चा होणार आहे.
मात्र या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कारण, मागील सहा महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीचा निधी स्थगित राहिल्यामुळे अनेक विकासकामे ठप्प झाली होती. आमदार जगजितसिंह पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर निधीवरील स्थगिती लागू झाली होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
या स्थगितीमुळे जिल्ह्यातील विकासकामांना ब्रेक लागला, ठेकेदारांमध्ये नाराजी वाढली आणि कार्यकर्त्यांमध्येही नैराश्य निर्माण झाले. सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकीय संघर्षामुळे जिल्ह्याचा विकास खुंटल्याची टीका सर्वत्र होत होती.
आता येत्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत निधीवरील स्थगिती उठवली जाणार का, हा सर्वांचा प्रश्न आहे. जर स्थगिती उठवून विकासकामांना हिरवा कंदील मिळाला, तर धाराशिव जिल्ह्याच्या विकासाला पुन्हा गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीतून काही ठोस निर्णय निघाले, तरच स्थगित प्रकल्पांना नवे जीवन मिळेल आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षांना न्याय मिळेल, अशी भावना जनतेत व्यक्त होत आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद” संपादक अमजद सय्यद 8390088786












