धाराशिव, दि.२७ ऑगस्ट (प्रतिनिधी):धाराशिव जिल्ह्यात येत्या २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. जिल्ह्यातील हजारो सार्वजनिक मंडळांद्वारे गणेशमूर्ती स्थापना करून विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, शांततेत व सुरक्षिततेत उत्सव पार पाडावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती शफाकत आमना यांनी केले आहे.
गणेशोत्सव हा ऐक्य, भक्ती आणि सामाजिक बंध यांचा उत्सव असला तरी, काही वेळा अति उत्साहामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले की, सर्व सार्वजनिक मंडळांनी आपली नोंदणी जवळच्या पोलीस ठाण्यात करणे आवश्यक आहे. तसेच ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी “एक गाव एक गणपती”, “एक गल्ली एक गणपती” यासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे. ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिनियम व नियमांचे काटेकोर पालन करावे. यासोबतच वाहनतळ व्यवस्थापन व वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
गणेश मंडपांना भेट देणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला सुरक्षा पथक व स्वयंसेविका नियुक्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात ४ पोलीस निरीक्षक, १९ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४० पोलीस उपनिरीक्षक, ५० एसआरपी प्लाटून, ७७० होमगार्ड व एकूण १६०० पोलीस कर्मचारी व अधिकारी कार्यरत राहणार आहेत.
“गणेशोत्सव दरम्यान कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता सर्वांनी घ्यावी. कोणताही सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही किंवा अपप्रवृत्तीला वाव मिळणार नाही, यासाठी नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे,” असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती शफाकत आमना यांनी केले आहे.












