धाराशिव, दि. २३ (प्रतिनिधी) – धाराशिव-उजनी रस्त्यावर बेंबळी गावाजवळील संगम हॉटेल धाब्याच्या समोर असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे भीषण अपघात घडला असून या अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे बेंबळी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
आज शनिवारी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असून उजनीकडून धाराशिवकडे येत असलेली मोटरसायकल बेंबळी गावातील संगम हॉटेल समोर (क्र. MH 25 AA 5686) रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यात आदळली. खड्ड्याचा अंदाज न आल्याने मोटरसायकलस्वाराचा तोल गेला आणि गाडीचा अपघात झाला. अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सदर इसमाची ओळख अद्याप पटलेली नसली तरी ते धाराशिव शहरातील सावरकर चौक येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे, अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली. अपघाताची माहिती पोलिसांना कळविण्यात आली आहे.
धाराशिव-उजनी रस्त्यावर बेंबळी परिसरात मोठमोठे खड्डे असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना सतत धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा अपघात घडूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाने अद्यापही दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.












