महिला सशक्तीकरणाचा पहिला ठोस प्रस्ताव : प्रभाग 18 मध्ये महिलांसाठी स्वतंत्र उद्यानाची मागणी — नगरसेवक उजमा सबा अजहर पठाण यांचे नगराध्यक्ष नेहा काकडे यांना निवेदन
धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्ष सौ. नेहा राहुल काकडे यांनी आज पदभार स्वीकारताच महिलांच्या हिताचा महत्त्वपूर्ण मुद्दा नगरपरिषदेच्या दालनात उपस्थित झाला. प्रभाग क्रमांक 18 च्या नगरसेवक श्रीमती उजमा सबा अजहर पठाण यांनी नगराध्यक्षांना निवेदन सादर करून प्रभाग 18 मध्ये महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित उद्यान विकसित करण्याची ठाम मागणी केली.
नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्याचा हा दिवस धाराशिव नगरपरिषदेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. पहिल्यांदाच एका महिलेकडे नगरपरिषदेचे नेतृत्व आले असून, या पार्श्वभूमीवर महिलांच्या हिताचे निर्णय घेऊन आपल्या कार्यकाळाची सुरुवात व्हावी, अशी भावना प्रभागातील महिलांनी नगरसेवक उजमा पठाण यांच्याकडे व्यक्त केली होती.
निवडणूक प्रचारादरम्यान प्रभागातील महिला रहिवाशांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी प्रभाग क्रमांक 18 मध्ये महिलांसाठी स्वतंत्र उद्यान उभारण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. महिलांना सुरक्षित व्यायाम, मानसिक विश्रांती, आरोग्य संवर्धन तसेच सामाजिक संवादासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असल्याचे नगरसेवक पठाण यांनी नमूद केले.
या उद्यानामुळे महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारेल, महिलांचे सामाजिक सशक्तीकरण वाढेल आणि लिंगसमतेच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पडेल. कुटुंबातील महिलांना स्वतःसाठी वेळ देता येईल, ज्यामुळे कौटुंबिक संतुलन राखण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यासाठी प्रभाग 18 मधील ‘गाजी पार्क’ ही जागा महिलांसाठी कायमस्वरूपी आरक्षित करण्यात यावी व आवश्यक विकासकामे तातडीने सुरू करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. उद्यानाच्या देखभालीसाठी नगरपरिषदेच्या वार्षिक बजेटमधून निधी उपलब्ध करून देण्यासह ‘नमो उद्यान योजना’ अंतर्गत विशेष निधी मिळवून अतिरिक्त सुविधा विकसित कराव्यात, असेही निवेदनात नमूद आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यास प्रभागासह संपूर्ण नगरपरिषदेचा विकासात्मक दृष्टिकोन समाजापुढे आदर्श ठरेल, असे सांगत नगरसेवक उजमा पठाण यांनी या उपक्रमासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. प्रभागातील महिलांना आता नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या सकारात्मक निर्णयाची व लवकरात लवकर कार्यवाहीची प्रतीक्षा आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












