दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; कळंबमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
धाराशिव (प्रतिनिधी):कळंब शहरासह परिसरात वाढत्या वाहन लुटी आणि दरोड्यांच्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.
कळंब ते केज मार्गावर हायवेवर वाहन लुटीचे प्रमाण वाढल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना कळंब शहरातील द्वारकानगरीजवळील बंद पेट्रोलपंप परिसरात दोन पिकअप वाहने व काही संशयास्पद इसम थांबलेले दिसून आले. पोलिसांनी तात्काळ छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये चंद्र भास्कर काळे (वय 35), सुभाष उर्फ हरी भास्कर काळे (वय 37), शामसुंदर विभीषण काळे (वय 34, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब), नवनाथ अनिल शिंदे (वय 26), राहुल अनिल शिंदे (वय 24, रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा, ता. वाशी), बालाजी माणिक काळे (वय 39, रा. शिराढोण) आणि दत्ता हिरा पवार (वय 34, रा. लोहार पूर्व, ता. कळंब) यांचा समावेश आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन पिकअप वाहने, लोखंडी धारदार तलवार, स्टीलचा रॉड, चार मोबाईल फोन असा एकूण 10 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गु.र. नं. 04/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 310(4), 310(5) तसेच शस्त्र अधिनियम कलम 4 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या गुन्हेगारी नोंदी तपासल्या असता त्यांच्यावर यापूर्वी दरोडा, जबरी चोरी व वाहन चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, पोहेकॉ. विनोद जानराव, नितीन जाधव, बबन जाधवर, अमोल निंबाळकर, दयानंद गाडेकर, बळीराम शिंदे, अशोक ठाणे, पुष्कर मुंगळे, मेहबूब अरब व प्रकाश बोडनवाड यांच्या पथकाने पार पाडली.












