एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन
मुंबई दि. ०७ (अमजद सय्यद) :एसटी महामंडळातील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी एसटी कामगारांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
कामगारांचे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, इतर थकीत भत्ते तसेच दिवाळी सण अग्रिम याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. सन २०१८ पासून कामगारांची आर्थिक देणी प्रलंबित असून ती पूर्ण करण्यासाठी सुमारे ४४०० कोटी रुपयांची तरतूद आवश्यक आहे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सरनाईक म्हणाले, “एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे ही माझी प्राथमिकता आहे. उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. जाहिरातींच्या माध्यमातून वर्षाला १०० कोटी, आधुनिक पार्सल सेवेच्या माध्यमातून १०० कोटी, बस आगारांमधील पेट्रोल पंपांचे व्यावसायीकरण आणि एसटीचे स्वतःचे प्रवासी ॲप या माध्यमांतून नवे उत्पन्नाचे स्रोत निर्माण होत आहेत.”
तसेच पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असून त्यामध्ये कामगारांसाठी सदनिका व विश्रामगृह उभारले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यामुळे कर्मचाऱ्यांना दर्जेदार सुविधा मिळतील आणि स्थावर मालमत्तेचा योग्य विकास होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.
या बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर यांच्यासह विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी संदीप शिंदे, समीर मोरे, श्रीरंग बरगे, हनुमंत ताटे, प्रकाश निंबाळकर, मुकेश तिगोटे, प्रदीप धुरंधर आदी उपस्थित होते.
“सत्य शोधून लिहिण्याची ताकद“
संपादक अमजद सय्यद 8390088786













