धाराशिव.दि.०६(प्रतिनिधी): धाराशिव शहरातील गणपती विसर्जनासाठी पारंपरिक ठिकाणी जागेची कमतरता जाणवत असल्याने मुख्याधिकारी श्रीमती नीता अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने हातलादेवी परिसरातील तलावात गणपती विसर्जनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
गणपती विसर्जनाच्या दिवशी शहरातील मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन सुरक्षितरीत्या पार पडावे यासाठी हातलादेवी तलाव परिसरात क्रेनच्या साहाय्याने मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. यावेळी तलावाच्या काठावर सुरक्षेसाठी बॅरिकेड्स उभारण्यात आले असून अपघात टाळण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.
नगरपालिकेच्या वतीने या परिसरात महामार्गावर लाईटची व्यवस्था तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. त्याबरोबरच स्वच्छता, सुरक्षारक्षक, पथकांची नेमणूक करून योग्य सोय करण्यात आली आहे. शहरातील विविध मंडळांच्या मोठ्या मूर्तींचे विसर्जन हातलादेवी तलावातच होणार असून या ठिकाणी मुख्याधिकारी श्रीमती अंधारे स्वतः उपस्थित राहून संपूर्ण नियोजनाची पाहणी करत आहेत.
शहरातील नागरिक, मंडळ कार्यकर्ते आणि स्वयंसेवक यांच्या सहकार्याने यंदाचे गणेश विसर्जन अपघातविरहित आणि शिस्तबद्ध पार पाडण्याचा निर्धार नगरपरिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे.



संपादक अमजद सय्यद 8390088786












