मुरूम मंडळात अतिवृष्टीचा तडाका…. खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान…. शेतकरी बांधव अडचणीत….
मुरुम (प्रतिनिधी) : महाराष्ट्रासह देशभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले असून धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरुम शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून जनजीवन पूर्णतः ठप्प झाले आहे. गेल्या आठवड्यात आलूर परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेली पिके संपूर्ण वाहून गेली. तर कदेर परिसरासह मुरुम परिसरातील गडीशिवार, खारोळी यांसह अनेक ठिकाणी पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. मुरुमजवळील बेनीतुरा साठवण तलाव प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडपाण्यातून येत असलेल्या पाण्यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांचे शेतमाल व पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शनिवारी (ता. २०) रोजी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे मुरुम शहरातील किसान चौक ते आष्टा कासार मार्गावरील प्रमुख पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. परिणामी नागरिक, शाळकरी विद्यार्थी, नोकरदार व व्यावसायिकांना प्रवासासाठी ७ किमी अंतराऐवजी तब्बल ३०-३५ किमी वळसा घ्यावा लागत आहे. तसेच मुरुम-अक्कलकोट मार्गावरील बेळंबजवळील पुलावरून देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने वाहनांची मोठी गर्दी झाली. परिणामी मुरूम अक्कलकोट मार्गावरील सर्वच वाहतूक सेवा पूर्णता बंद करण्यात आली होती पुलावरील पाणी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. काही तरुणांनी मात्र धोकादायक टवाळक्या करत पाण्याचा मोठा प्रवाह पार करण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले.
दरम्यान, या परिस्थितीची दखल घेत मुरुम शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मात्र संपूर्ण घटनेने आक्रमक होत पहाटेपासूनच घटनास्थळी दाखल झाले. महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोलिस प्रशासनाशी संपर्क साधत पंचनामे व पाहणी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना तात्काळ व सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली, त्यावेळी शेतकऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी तहसील प्रशासनाविरोधात मात्र शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सुर उमटला आहे. उमरगा तालुक्याचे तहसीलदार गोविंद येरमे हे दोन दिवसापूर्वी स्थानिक नेत्यांच्या वाहनातून पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते. त्यांनी पत्रकारांशी बोलताना “मुरुम महसूल मंडळात अतिवृष्टी झाली नाही” असे वक्तव्य केल्याने संतापाची लाट उसळली आहे. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष नुकसानीकडे बोट दाखवत तहसीलदारांवर रोष व्यक्त केला. सध्या शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तातडीने लक्ष घालून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाचिटणीस दत्तात्रय इंगळे, युवक शहराध्यक्ष बाबा कुरेशी, लखन भोंडवे, इमरान सय्यद, जावेद ढोबळे किशोर शिंदे, बालाजी मंडले यांच्यासह अनेक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












