कळंब: ईद ए मिलादनिमित्त आझाद ग्रुपच्यावतीने आयोजित सिरत-उन-नबी प्रश्नोत्तरे परीक्षा रविवारी यशस्वीरित्या पार पडली. या परीक्षेत 429 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये मुलींची संख्या उल्लेखनीय होती. आझाद ग्रुपने डीजेला फाटा देऊन मोहम्मद पैगंबर यांच्या जीवन चारित्र्यची माहिती मुलांना व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आहे. इस्लामपुरा येथील गॅलेक्सी फंक्शन हॉल येथे ही स्पर्धा पार पडली. स्पर्धा दोन गटात घेण्यात आली ग्रुप १ मध्ये ४थी ते ७वी तर ग्रुप २ मध्ये ८वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची उंची वाढावी आणि धार्मिक तसेच सामाजिक जाणीवा बळकट व्हाव्यात, हा या उपक्रमामागचा उद्देश होता. स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण सोहळा ५ सप्टेंबर रोजी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रुप १ मध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्याला कुलर, द्वितीय आणि तृतीय क्रमांकास कॉम्प्युटर स्टडी टेबल देण्यात येईल. तर ग्रुप २ मधील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला सायकल, आणि द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर स्टडी टेबल बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिला जाणार आहे. मान्यवरांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी पारितोषिक वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक उमरान मिर्झा यांनी केले.












