पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या निर्देशाने तत्काळ उपाययोजना…धाराशिव बसस्थानकात प्रवाशांसाठी आरओ पाण्याची सुविधा – लोकमदत न्यूजच्या बातमीची तात्काळ दखल
धाराशिव दि.०४(प्रतिनिधी):धाराशिव शहरात सहा महिन्यांपूर्वी नव्याने बांधण्यात आलेल्या मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा नसल्याची बातमी लोकमदत न्यूजने प्रसिद्ध केल्यानंतर, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
पालकमंत्र्यांच्या या निर्देशानंतर परिवहन विभागाने तत्परता दाखवली. विभागीय नियंत्रक अजय पाटील यांनी तातडीने हालचाल करत बसस्थानक परिसरातील सुरक्षित ठिकाणी आरओ प्लांट बसविण्याचे आदेश दिले. त्यानुसार विभागीय अभियंता राहुल पवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन आवश्यक काम तातडीने पूर्ण केले. परिणामी, धाराशिव बसस्थानकात स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी प्रवाशांना उपलब्ध झाले असून, यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
दररोज हजारो प्रवासी या बसस्थानकातून प्रवास करतात. मात्र, आतापर्यंत पाण्याची सोय नसल्याने मोठी गैरसोय होत होती. सुरक्षित ठिकाणी आरओ प्लांट बसवल्यानंतर या समस्येवर दिलासा मिळाला असला, तरी प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या दृष्टीने एकाच ठिकाणी असलेली पाण्याची सोय अपुरी पडणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रवासीवर्गाने बसस्थानकात आणखी एक-दोन ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.
लोकमदत न्यूजने मांडलेल्या प्रश्नाला गंभीरतेने घेत तात्काळ उपाययोजना केल्याबद्दल प्रवासीवर्गात परिवहन विभागाबद्दल समाधान व्यक्त होत असून, पालकमंत्री सरनाईक आणि विभागीय नियंत्रक पाटील यांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे. विभागीय अभियंता राहुल पवार यांनी दाखवलेला व्यक्तिगत पुढाकारही प्रशंसनीय ठरत आहे.
या कार्यवाहीमुळे प्रशासनिक संवेदनशीलता आणि जनहिताला प्राधान्य देणारी सकारात्मकता स्पष्टपणे दिसून आली आहे. आगामी काळात प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यासाठी विभाग आणखी प्रयत्नशील राहील, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786













