धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ दिलासा द्यावा – सुजितसिंह ठाकूर यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडे मागणी
धाराशिव, दि.२५ (प्रतिनिधी) : धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात झालेल्या ढगफूटीसदृश अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकताच दौरा केला. या पाहणी दौऱ्यात माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुजितसिंह ठाकूर यांनी अजितदादा पवार यांची भेट घेऊन शेतकरी व नागरिकांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी केली.
ठाकूर यांनी सांगितले की, परंडा, भूम व वाशी तालुक्यात आतापर्यंतचा सर्वात मोठा व उच्चांकी पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे शेतजमिनी खरडून गेल्या असून शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. अनेक ठिकाणी पशुधन दगावले आहे तर नद्या, नाले व ओढ्यांना आलेल्या महापुरामुळे गावोगावी घरात पाणी शिरून घरसामान व साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकूर यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे संपूर्ण धाराशिव जिल्हा “ओला दुष्काळग्रस्त” घोषित करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना सरसकट व भरीव आर्थिक मदत मिळावी, खरडून गेलेल्या शेतजमिनी पुन्हा पूर्ववत करण्यासाठी शासकीय मदत द्यावी, दगावलेल्या पशुधनाच्या मालकांना तात्काळ दिलासा मिळावा तसेच नागरिकांच्या घरांचे व साहित्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












