धाराशिवमध्ये आंतरजातीय-आंतरभाषिक विवाह; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांना सलाम
धाराशिव | लोकमदत न्यूज
धाराशिवमध्ये जाती व भाषेची बंधने झुगारून देत एक अनोखा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ढेकरी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथील आयु. प्रतीक हरिदास कदम यांचा मंगल परिणय पश्चिम बंगालमधील खरकपूर (जि. पश्चिम मिदनापूर) येथील आयु. सोनाली श्यामलाल सिंकू हिच्याशी २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता ॲपल हॉटेल येथे दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. दोन्ही परिवारांच्या संमतीने झालेला हा आंतरजातीय व आंतरभाषिक विवाह उपस्थित पाहुणे, नातेवाईक व मित्रपरिवारांच्या साक्षीने आनंदोत्सवात पार पडला.
प्रतीक आणि सोनाली यांची ओळख पाच वर्षांपूर्वी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस येथे शिक्षण घेत असताना झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि अखेर या नात्याने विवाहाचे स्वरूप धारण केले. हा प्रवास मात्र सोपा नव्हता. सोनाली व तिच्या कुटुंबाला मराठी भाषेचे ज्ञान नाही, तर प्रतीकच्या कुटुंबाला बंगाली भाषेची ओळख नव्हती. तरीही परस्पर समजूतदारपणा, विश्वास आणि कुटुंबियांचा पाठिंबा यामुळे दोन्ही कुटुंबे एकत्र आली.
सप्टेंबर महिन्यात सोनालीचा संपूर्ण परिवार ढेकरी येथे भेटीसाठी आला. संवाद, ओळख आणि परस्पर विश्वासाच्या आधारावर दोन्ही परिवारांनी विवाहाचा निर्णय घेतला. प्रेमविवाह असला तरी दोघांनीही आपल्या कुटुंबाला विश्वासात घेऊन पुढे जाण्याचा मार्ग निवडला, ही बाब विशेष ठरली.
या विवाह सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी कदम परिवार, सिंकू परिवार, जावई विकास काकडे, आनंद गंगावणे, मामा प्रविण सूर्यवंशी तसेच समस्त सूर्यवंशी परिवार व मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
समाजातील जातीय व भाषिक भिंती ओलांडून नातेसंबंध दृढ करण्याचा हा प्रयत्न म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या समताधिष्ठित समाजव्यवस्थेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून दिलेला मान मानला जात आहे. आंतरजातीय विवाह हे सामाजिक एकात्मतेचे प्रभावी साधन असल्याचे मत व्यक्त होत असून, तरुणांनी प्रतीक व सोनाली यांच्या निर्णयातून प्रेरणा घ्यावी, अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.
नवविवाहित दाम्पत्याला भावी आयुष्यासाठी सर्व स्तरांतून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786













