#JusticeForLadyMedicalOfficer : डॉक्टर संपदा मुंडे यांना श्रद्धांजली व न्यायासाठी धाराशिवमध्ये कॅन्डल मार्च – वैद्यकीय संघटनांचे नागरिकांना आवाहन
धाराशिव – (प्रतिनिधी) आज दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी धाराशिव शहरात फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या सर्व आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी तसेच तपास CBI / CID / SIT कडे वर्ग करावा, या मागणीसाठी कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला आहे.
या आंदोलनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी गट अ संघटना धाराशिव, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) धाराशिव, तसेच वूमन्स डॉक्टर्स विंग धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हा कॅन्डल मार्च सायंकाळी 6 वाजता राजमाता जिजाऊ चौक येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे. या माध्यमातून डॉक्टर संपदा मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली जाणार आहे.
या संदर्भात मॅग्मोचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत बलवंडे आणि आयएमए अध्यक्ष डॉ. महेश कानडे यांनी नागरिक, महिला, युवती, विद्यार्थी आणि सर्व सामाजिक संघटनांना आवाहन केले आहे की,“या न्यायलढ्यात सर्वांनी एकत्र येऊन सहभाग घ्यावा, कारण हा लढा केवळ एका डॉक्टरसाठी नसून संपूर्ण वैद्यकीय समाजाच्या सन्मानाचा आहे.”
डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत असून, सोशल मीडियावर #JusticeForLadyMedicalOfficer हा हॅशटॅग जोरदारपणे ट्रेंड होत आहे.
धाराशिव शहरातील हा कॅन्डल मार्च महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी एकजुटीचा संदेश देणारा ठरणार आहे.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786












