धाराशिव (प्रतिनिधी) – कनगरा (ता. धाराशिव) येथील माजी सरपंच शरद हनुमंतराव पाटील आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध गंभीर आरोप करत अनुसूचित जातीच्या नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे १० जून २०२५ रोजी सामूहिक तक्रार सादर केली होती. मात्र, दोन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी १३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली.
तक्रारीनुसार, माजी सरपंचांनी पदाचा गैरवापर करून गावातील अनुसूचित जातीच्या वस्तीकडे जाणारा सार्वजनिक रस्ता अडवून तो स्वतःच्या मालकीत दाखवला आहे. हा रस्ता नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यावश्यक असून, तो बंद झाल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, गावाच्या भूमापन नकाशानुसार असलेल्या ७० x ३० फुटांच्या सार्वजनिक जागेवर बेकायदेशीररीत्या कंपाउंड बांधून अतिक्रमण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी या प्रकाराची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी समिती नेमावी, रस्ता तातडीने खुला करावा आणि अतिक्रमण काढून टाकावे, अशी मागणी केली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे. सुमारे ४० ते ५० महिला, पुरुष आणि लहान मुले या आंदोलनात सहभागी आहेत.
या उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करून ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी केली.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रकरणात लवकरात लवकर हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.












