धाराशिव दि.१४(प्रतिनिधी):धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अवघ्या २४ तासांच्या आत अटक करून स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटविला आहे.
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफाकत आमना (प्रभारी पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे बांबळीच्या सहकार्याने पार पडली.
करजखेडा येथे काल घडलेल्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिस ठाणे बांबळी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयितांवर गुप्त पाळत ठेवून होते. गुन्हा 209/2025 कलम 103, 3(5) बीएनएस अन्वये नोंदविण्यात आला होता. सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी १) जीवन हरिबा चव्हाण आणि २) हरिबा यशवंत चव्हाण हे पुण्यात नातेवाईकांकडे पळून गेले असल्याचे समजताच तत्काळ पुणे गाठून लपून बसलेल्या संशयितांना शोधून काढले.
त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ पुण्यात दाखल झाले. पथकाने आरोपींच्या नातेवाईकांच्या घरावर दक्ष नजर ठेवून,संशयित असल्याचे अधिकृत माहिती मिळताच योग्य क्षण साधून आरोपींना जेरबंद केले. दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन धाराशिव येथे आणण्यात आले असून त्यांची वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना पोलीस ठाणे बांबळी येथे हजर करण्यात आले.
या यशस्वी कारवाईत पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, स.पो.नि. सचिन खटके, पोह. विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गाडेकर, पोना. बाबन जाधवर, अशोक ढगारे, विजय धुळे, महेबुब अरब आदींचा विशेष सहभाग होता.
स्थानिक गुन्हे शाखेने दाखविलेल्या तत्परतेमुळे गुन्ह्याचा तपास अवघ्या चोवीस तासांत लावून दोघांना बेड्या ठोकून वेगाने छडा लागला असून, यामुळे नागरिकांमध्ये कायद्याबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. ही कारवाई संपूर्ण पोलीस यंत्रणेच्या कौशल्य, समन्वय आणि धैर्याचे उत्तम उदाहरण ठरली आहे.












