धाराशिव (प्रतिनिधी) – गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात शेतकरी हवालदिल झाले आहेत. वाशी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे आज (शनिवार) दुपारी साडेतीन वाजता वाशी तालुक्यात दाखल होणार आहेत. त्यांनी इंदापूर, जिल्हा पुणे येथून प्रस्थान करून प्रथम वाशी शहर व परिसरातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करणार असून पिकांचे झालेले नुकसान, शेतजमिनींची स्थिती याबाबत ते प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक प्रशासन आणि शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
संध्याकाळी साडेपाच वाजता पाहणी दौरा पूर्ण करून मंत्री भरणे हे इंदापूर (जि. पुणे) कडे रवाना होणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित अंदाजपत्रक तयार होऊन मदत कार्याला गती मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.












